नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : पब्लिक प्रोव्हीडंट फंड ( PPF ) सरकारची छोटी बचत योजना आहे. पीपीएफचे व्याज दर वाढविण्या संदर्भात या महिनाअखेर निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर 30 सप्टेंबर रोजी व्याज वाढविण्याबाबत निर्णयाची घोषणा केली जाऊ शकते. पीपीएफच्या व्याजदरात एप्रिल 2020 पासून कोणताही बदल केलेला नाही. सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे. छोट्या बचत योजनेत गुंतवणूकीवर लागू व्याज दराला सरकारतर्फे तिमाही आधारावर निश्चित केले जाते.
पीपीएफवर व्याज दर वाढण्याची वाट गुंतवणूकदार खूप काळापासून पाहात आहेत. परंतू तज्ज्ञांच्या मते सरकारच्या तर्फे यंदा ऑक्टोबर ते डीसेंबरच्या तिमाहीचे व्याज दर 7.10 टक्के कायम ठेवले जाऊ शकतात. याआधी जून महिन्यात अर्थ मंत्रालयाने सुकन्या समृद्धी योजनावर मिळणाऱ्या व्याज दरात सरकारने वाढ केली होती.
प्रत्येक तिमाहीसाठी लागू व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षांच्या शेवटी गुंतवणूकदारांच्या पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा होतो. त्याच बरोबर गुंतवणूकदारांना वार्षिक चक्रवाढ व्याजही मिळते. दर कॅलेंडर महिन्यासाठी व्याजाची मोजणी पाचव्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटी खात्यात किमान शिल्लक लक्षात घेऊन केली जाते. वर्षांच्या सुरुवातीला पीपीएफ गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षांत जमलेल्या रकमेवर व्याज मिळत रहाते.
अर्थसल्लागार गुंतवणूकीवर जास्तीत जास्त रिटर्न मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत निश्चित रक्कम खात्यात जमा करण्याचा सल्ला देतात. यामुळे संपूर्ण महिन्याचे व्याज मिळण्याचा रस्ता मोकळा होतो. कोणीही व्यक्ती पीपीएफ खात्यात 1.5 लाखापर्यंत वार्षिक जमा रकमेवर सेक्शन-80 सी नूसार आयकर लाभाचा दावा करु शकतो. याशिवाय पीपीएफ मॅच्युरिटी अमाऊंट टॅक्स फ्री होत असते. छोट्या बचत योजनांच्या व्याज दराचा आढावा यंदा 30 सप्टेंबर 2023 रोजी घेतला जाणार आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी छोट्या बचत योजनावरील व्याज दरात 30 बीपीएस वाढ करण्यात आली होती.