मुंबई : तुम्ही जर एलईडी टीव्ही (LED TV) किंवा फ्रीज (Refrigerators) घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घेऊन टाका. कारण नव्या वर्षात म्हणजेच येत्या जानेवारीपासून या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. तांबे, अॅल्युमिनीयम आणि स्टीलचा भाव वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या समुद्र आणि हवाई भाड्यात वाढ झाल्याने त्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्या एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या वस्तूंच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तुम्हाला या वस्तूंसाठी पुढच्या महिन्यापासून खिशातून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत (prices of tv and appliances to go up).
जागतिक विक्रेत्यांकडून पुरवठा कमी झाल्यामुळे टीव्ही पॅनलच्या (Opencell) किंमतीही दोन पटीने वाढल्या आहेत, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे प्लास्टिकच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे कंपन्या नवीन वर्षात घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती वाढवणार आहेत (prices of tv and appliances to go up).
‘या’ कंपन्या किंमती वाढवणार
जानेवारीपासून किंमती वाढवणं जरुरीचं आहे, असं एलजी (LG) , पॅनासोनिक (Panasonic) आणि थॉमसन (Thomson) या कंपन्यांनी सांगितलं आहे. तर सोनी (Sony) कंपनी सध्याच्या परिस्थितीची आढावा घेत आहेत. एलजी, पॅनासॉनिक आणि थॉमसन सारख्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, जानेवारीपासून किंमती वाढवणे गरजेचे झाले आहे. सोनी अजूनही परिस्थितीचा आढावा घेत असला तरी किंमती नंतर ठरवल्या जातील.
पॅनासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा येत्या काळात आपल्या उत्पादनांवर परिणाम होईल. माझ्या अंदाजानुसार किंमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात. पहिल्या तिमाहीत किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
एलजी इलेक्ट्रॉनिक इंडिया पुढच्यावर्षी 1 जानेवारीपासून आपल्या वस्तूंच्या किंमती 7 ते 8 टक्क्यापर्यंत वाढवणार आहे. याबाबत एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे होम अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही जानेवारीपासून किंमती 7 ते 8 टक्क्यांनी वाढवणार आहोत. त्यात टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिजचा समावेश आहे. अॅल्युमिनियम, तांबे तसेच प्लास्टिकच्या किंमतीही वाढल्या आहेत. शिवाय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्ही अजूनही वेट अॅण्ड वॉच भूमिकेत आहोत. आम्ही सध्या किती पुरवठा होईल, त्याकडे बघत आहोत. परिस्थिती अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे परिस्थिती नेमकी कोणत्या बाजूने चालली आहे, हे आम्ही अजूनही ठरवू शकत नाहीत. पण पॅनल आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत खरंच वाढ झाली आहे”, असं नय्यर यांनी सांगितलं.
टीव्हीचे दर 20 टक्क्यांनी वाढणार
भारतातील थॉमसन आणि कोडॅक या फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडचे सुपर प्लास्ट्रॉनिक्सचे (Super Plastronics) मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीतसिंग मारवाह यांच्यामते नव्या वर्षात टीव्हीचे दर तब्बल 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. “टीव्ही ओपनसेलच्या किंमती 200 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पॅनलच्या किंमतीत 200 टक्के वाढ झाली असली तरी पुरवठा कमी आहे. जागतिक पातळीवर पॅनल उभारणीला पर्याय नसल्याने आपण चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे थॉमसन आणि कोडॅक जानेवारीपासून अँड्रॉइड टीव्हीच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ करतील”, असं मत त्यांनी मांडली.
हेही वाचा : नव्या वर्षात रोजगाराची सुवर्णसंधी, ‘ही’ कंपनी देतेय 1100 इंजिनियर्सना नोकरी