नवी दिल्ली : अमेरिकेत भारताचा डंका वाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास आग्रहामुळे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारतीय व्यापार आणि उद्योगांना चालना मिळण्याची शक्यता असल्याने शेअर बाजाराला आज 21 जून रोजी आनंदाचे भरत आले आहे. भारतीय शेअर बाजाराने (Indian Share Market) नवीन इतिहास रचला आहे. बुधवारच्या व्यापारी सत्रात शेअर बाजाराने नवीन रेकॉर्ड तयार केला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. सुरुवाती सत्रातच भारतीय निर्देशांक 63,588 रुपयांच्या नवीन स्तरावर पोहचला. 1 डिसेंबर 2022 नंतर निर्देशांकाने ही नवीन गगन भरारी मारली आहे. अर्थात यामुळे इन्ट्रा-डेमध्ये अनेकांनी छपाई केली, हे वेगळं सांगायला नको.
चीन नाही, भारत
कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाल्यापासून अवघे जग चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिथे झिरो कोविड पॉलिसी हटविण्यात आली असून बाजार खुले करण्यात आले आहे. पण तरीही अनेक जागतिक कंपन्यांनी चीनमधील बस्तान हलवून ते भारत आणि ईशान्य पूर्वेतील इंडोनेशिया, मलेशियाकडे हलविले आहे. भारतीय बँकिंग सिस्टिम मजबूत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय बाजारातील एक ही मोठी बँक अद्याप बुडीत झाली नाही. त्यामुळे चीनऐवजी भारताकडून जगाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठे जागतिक प्रकल्प भारतात येण्याची शक्यता आहे.
भारतावर वाढला विश्वास
बुधवारच्या व्यापारी सत्रात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी यासारखे शेअर जोरदार धावले. तर श्रीराम फायनान्स, पीरामल एंटरप्राईजेस यासारख्या शेअर्समध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागले. बाजारात गुंतवणूकदारांचा भरवसा वाढला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा भारतीय बाजारात गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन दौऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसताच, बाजारात तेजीचे सत्र सुरु झाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला लवकरच मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे.
बाजाराची रणनीती काय
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारताच्या व्यापार आणि व्यावसायिक वृद्धीचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसात बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येईल. बाजार आणखी आगेकूच करेल. विविध क्षेत्रानुसार विचार करता अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी बाजारात जोरदार प्रदर्शन केले. निफ्टी ऑटो मध्ये 0.61 टक्के तेजी दिसून आली. तर फायनेन्शिअल सेक्टरमध्ये 0.51 तेजी दिसून आली. बाजार येत्या काही दिवसात अजून जोरदार कामगिरी बजाविण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटते. देशात आता काही महिन्यानंतर निवडणुकांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे बाजाराची सकारात्मक चाल दिसून येईल.