R G Chandramogan : गावा-गावात जाऊन विक्री केले आईसक्रीम, उभी केली 20,000 कोटींची कंपनी
R G Chandramogan : देशात दुष्काळाचे सावट असताना या व्यक्तीने आईसक्रीम उद्योगात उडी घेतली. देशात आणीबाणी लादलेली असताना, स्थित्यांतर सुरु असताना त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली. गावागावात जाऊन आईसक्रीमची विक्री केली. आज हा ब्रँड 20,000 कोटींचा झाला आहे.
नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : 1970 चा काळ मोठ्या धामधुमीचा होता. देशात अनेक स्थित्यांतरे सुरु होती. राजकारणात, देशाच्या सीमेवर, अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदलाचे वारे वाहत होते. देशात मोठी उलथापालथ सुरु होती. अशावेळी या व्यक्तीने नोकरी सोडली आणि आईसक्रीमचा व्यवसाय (Ice Cream Business) सुरु केला. सुरुवातील अवघ्या तीन कामगारांवर या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आईसक्रीम विक्री करण्यासाठी इतरासारखेच मालकाने पण काही गावांना, तालुक्यांना भेटी दिल्या. तिथे आईसक्रीम विक्री केली. अनुभव येत गेले. व्यवसायाला लोकांचे प्रेम आणि आर्थिक बळ मिळत गेले. इतक्या वर्षात या ब्रँडने पण अनेक बदल अनुभवले. आज हा लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. संस्थापक आर. जी. चंद्रमोगन (R. G. Chandramogan) यांच्या अपार कष्टामुळे आज हा ब्रँड 20,000 कोटींचा झाला आहे.
हटसन कंपनी
तु्म्ही Hatsun कंपनीची आईसक्रीम खाल्लं असेल. या ब्रँडचे दही, बटर सह इतर अनेक डेअरी प्रोडक्ट वापरले असतील. 1970 मध्ये हा ब्रँड सुरु झाला. सुरुवातीला फिरत्या हातगाडीवर या ब्रँडची गावोगावी विक्री करण्यात आली. चंद्रमोगन यांनी हटसन (Hatsun Agro Product Limited) या ब्रँडची सुरुवात केली.
शिक्षण मध्येच सोडले
हटसन एग्रो प्रोडक्टचे मालक आर जी चंद्रमोगन यांच्या जन्म तामिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल या गावात झाला. गावातच त्यांचे शिक्षण झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना शिक्षण मधातच सोडावे लागले. त्यांनी सॉमीलमध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यांना या ठिकाणी 65 रुपये पगार मिळत होता.
आईसक्रीम विक्रीची सुरुवात
R. G. Chandramogan यांना अचानक आईसक्रीम व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांच्याकडे काही बचत होती. कुटुंबियांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जमीन विक्री केली. त्यातून 13,000 रुपये जमा झाले. त्यातून आईसक्रीम कंपनी सुरु झाली. रोयापुरम येथे 250 चौरस फुटावर व्यवसाय सुरु झाला. त्यावेळी तीन कर्मचारी होते. हा ब्रँड नावारुपाला यायला 10 वर्षे लागली.
आज 4 लाख शेतकरी जोडल्या गेले
चंद्रमोगन यांनी सुरुवातीला छोटी खेडी आणि गावावर लक्ष्य केंद्रित केले. 1981 मध्ये त्यांनी अरुण हा ब्रँड बाजारात उतरवला. त्यानंतर कंपनीचे नाव त्यांनी हटसन एग्रो प्रोडक्ट कंपनी असे केले. देशातील प्रमुख डेअरी उत्पादकांपैकी हा एक ब्रँड आहे. आज देशभरातील 10 हजार गावातील 4 लाख शेतकरी जोडल्या गेले आहेत. आईसक्रीम शिवाय आरोक्य मिल्क, हटसन दही, पनीर आणि इतर उत्पादने ही कंपनी विक्री करते. जगातील 38 देशांमध्ये ही कंपनी हटसन उत्पादने विक्री करते.
आज 20 हजार कोटींची कंपनी
आज त्यांची कंपनी 20 हजार कोटी रुपयांची झाली आहे. फोर्ब्सच्या बिलेनियर्सच्या यादीत आर. जी. चंद्रमोगन हे श्रीमंतांच्या यादीत आहेत. श्रीमंतांच्या यादीत ते 93 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ 2.4 अब्ज डॉलर आहे.