भारताचे वॉरेन बफे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ आजही अनेक जण फॉलो करतात. त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. आज ते आपल्यात नाहीत. त्यांचा आज 64वा वाढदिवस आहे. ते बाजारातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जबरदस्त निरीक्षण शक्तीतून त्यांनी अनेक मंत्र गुंतवणूकदारांना दिले आहेत. त्यांच्या मुलाखतीतून त्यांनी अनेकदा याविषयीची माहिती दिली आहे. बाजारातील चढउताराच्या हिंदोळ्यावर स्वार होत कमाई कशी करायची याचा मंत्र आजही उपयोगी पडतो. पण त्यांचे 4 ‘म’ तुम्हाला माहिती आहेत का?
काय आहेत 4 ‘म’ ?
झुनझुनावाला यांनी एका मुलाखतीदरम्यान या 4 ‘म’ चा उल्लेख केला होता. 4 ‘म’ विषयी कोणीच अचूक भविष्यवाणी करु शकत नाही, हा त्यांचा दावा होता. यामध्ये मौसम, मार्केट, मौत आणि महिला यांचा समावेश होतो. यांच्याविषयी कोणीही अचूक भविष्यवाणी करु शकत नाही, असे ते का म्हणाले होते?
कोण देईल भरवसा?
हवामान, मृत्यू, शेअर बाजार आणि स्त्रीचा स्वभाव पुढील क्षणी कोणतं वळण घेईल, याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, हे त्यांचे आणखी एक वाक्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होतं. बाजार हा स्त्रीसारखा आहे. तो नेहमीच गूढ असतो. तो नेहमी अस्थिर असतो. अस्थिरता हाच शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. स्त्रीवर जसे तुम्ही कधीच वर्चस्व गाजवू शकत नाही. तसेच बाजारावर ही तुम्ही वर्चस्व ठेऊ शकत नाही असे ते म्हटले होते.
मुक्काम पोस्ट ऑर्थर रोड जेल
शेअर बाजारात कोणीच राजा नसतो, हे त्यांचे वाक्य अनेकांनी त्यांच्या काळजावरुन कोरुन ठेवले आहे. बाजारात कोणीच किंग होऊ शकत नाही. ज्याने हा प्रयत्न केला, त्याची काय अवस्था झाली याचे दाखले गुंतवणूकदारांना द्यायची गरज नाही. ज्यांनी शेअर बाजारात राजा होण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पुढचा मुक्काम ऑर्थर रोड जेल असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बाजाराच स्वतः राजा असल्याचे त्यांनी छातीठोकपणे नमूद केले होते. त्यांच्या डोक्यात कधीच मार्केटची हवा गेली नाही. ते कायम जमिनीवर असल्याचे अनेक जण सांगतात.
टायटनने उघडले नशीब
राकेश झुनवाला यांनी 2003 साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या त्यांच्या निर्णयाने नशीब पालटले. त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या 3 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल केले. आजही या शेअर्समध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि हा शेअर किंमती मानल्या जातो.
18 व्या वर्षी शेअर बाजारात
स्टॉक्स निवडताना झुनझुनवाला चोखंदळ होते. ज्या स्टॉकवर कोणाचे लक्ष नसायचे असे ते निवडायचे आणि गुंतवणूक करायचे. या स्टॉकने त्यांना छप्परफाड कमाई करुन दिली. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा 40 वर्षांहून अधिक अनुभव होता. गुंतवणूकदारांनी त्याच्या टिप्स पाळल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता.