मुंबई : शेअर बाजारातील बिग बूल, भारताचे वॉरेन बफे, शेअर बाजारातील (Share market) मोठं नाव असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज निधन झालं . ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं उद्योग जगतात मोठी दरी निर्माण झाली आहे. आजचा दिवस उद्योग जगतासाठी काळा दिवस असल्याचं बोललं जातंय. मुंबईतील (Mumbai) ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. आज सकाळी 6.40 वाजता त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. ते मधुमेह आणि किडनीच्या त्रस्त होते, असं सांगण्यात येत आहे. जुलै 2022मध्ये राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 5.5 अब्ज डॉलर होती. ते भारतातील 36 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी 5000 रुपये कमवून शेअर मार्केटमध्ये करिअरची सुरुवात केली आणि नंतर ते या मार्केटचे अनुभवी बनले. झुनझुनवाला मुंबईत राजस्थानी कुटुंबात वाढले. त्यांचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांनी सिडनहॅम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना आपल्या मित्राशी मार्केटमध्ये बोलताना ऐकले तेव्हा त्यांना शेअर मार्केटमध्ये रस निर्माण झाला. त्याच्या वडिलांनी त्यांना या क्षेत्रात मार्गदर्शन केलं. परंतु त्यांनी राकेश झुनझुनवाला यांना कधीही गुंतवणुकीसाठी पैसे दिले नाहीत आणि मित्रांना पैसे मागण्यास नकार दिला.
झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील बचतीच्या रकमेतून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 1985 मध्ये त्यांनी 5000 रुपयांपासून सुरुवात केली आणि आज त्यांची गुंतवणूक 11000 कोटींपर्यंत वाढली आहे. त्यांना बुल मार्केटचा राजा म्हणून ओळखले जातं. त्यांचा पहिला मोठा नफा 1986 मध्ये 5 लाख होता. 1986 ते 1989 या काळात त्यांना सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा नफा झाला. त्यांनी 1986 मध्ये टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले जे तीन महिन्यांत वाढून 143 रुपये झाले आणि 3 पट नफा झाला. 2021 पर्यंत त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत होती. ज्याची किंमत 7294.8 कोटी रुपये होती.
झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष देखील होते. याशिवाय प्राइम फोकस ली., जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लि., प्राज इंडस्ट्रीज लि., प्रोव्होग इंडिया लि., कॉन्कॉर्ड बायोटेक लि., इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लि., मिड डे मल्टीमीडिया लि., नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लि. ., व्हाइसरॉय हॉटेल्स लि. आणि टॉप्स सिक्युरिटी लि. यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला.