Loan : कर्ज पुन्हा महागणार? RBI च्या बैठकीकडे आता बँकांसह ग्राहकांचेही लक्ष..
Loan : कर्ज पुन्हा महागणार का? आरबीआयच्या बैठकीत काय होईल निर्णय..
नवी दिल्ली : पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची(Monetary Policy Committee) बैठक होत आहे. आता या बैठकीकडे बँकाच नाही तर ग्राहकांचे लक्ष लागले आहे. कारण या बैठकीत जो निर्णय होईल. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे. कारण महागाई (Inflation) अजूनही नियंत्रणात आलेली नाही. दिवाळीत ग्राहकांनी जमके खरेदी केली असली तरी त्यांना नोव्हेंबरमध्ये मात्र दिलासा मिळेल की नाही ही चिंता सतावत आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बैठकीनंतर वारंवार रेपो दरात वाढ केलेली आहे. मे महिन्यापासून बँकेने आतापर्यंत चार वेळा ही वाढ केलेली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
महागाईमुळे अगोदरच वेतन अपुरे पडत आहे. त्यात गृह, वाहन अथवा वैयक्तिक कर्जापोटी घेतलेले हप्तेही आरबीआयच्या धोरणामुळे वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सप्टेंबर महिन्यात पतधोरण समितीची बैठक झाली होती. त्यानंतर ही बैठक डिसेंबर महिन्यात होणार आहे. दरम्यान आता 3 नोव्हेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहुयात..
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. ही बैठक आरबीआयच्या नियमानुसार होत आहे. अशी बैठक तेव्हा घेतल्या जाते, जेव्हा केंद्रीय बँक सलग तीन तिमाहीत महागाई काबूत करण्यात अपयशी ठरते.
केंद्र सरकारने केंद्रीय बँकेला लक्ष्य दिले आहे. त्यानुसार, बँकेला महागाई दर 4 टक्क्यांवर आणयचा आहे. त्यामध्ये 2 टक्क्यांची लवचिकता गृहित धरण्यात आली आहे.
परंतु, सलग तीन तिमाहीत महागाईचा दर 2 ते 6 दरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नियमानुसार सरकारला आरबीआयला उत्तर देणे गरजेचे ठरते. त्यासाठीच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे.
बाजारातील तज्ज्ञानुसार, केंद्रीय बँक या बैठकीत आणि डिसेंबर महिन्यातील बैठकीनंतर रेपो दरात वाढ करण्याची शक्यता दाट आहे. या बैठकीत पुन्हा अर्धा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तीन महिन्यांत रेपो दरात (Repo Rate) 1.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दर पुन्हा एकदा 0.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय बँकेने घेतला. रेपो दर आता 5.40 टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा वाढ झाल्याने हा दर 5.9 टक्क्यांवर पोहचला आहे.