RBI ला दुसरा झटका, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या 7 महिन्यात दुसऱ्यांदा आरबीआयच्या बड्या अधिकाऱ्याने मुदतीपूर्वी राजीनामा सादर केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयला 7 महिन्यात दुसरा झटका बसला आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या 7 महिन्यात दुसऱ्यांदा आरबीआयच्या बड्या अधिकाऱ्याने मुदतीपूर्वी राजीनामा सादर केला आहे. यापूर्वी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता.
सहा महिने आधीच राजीनामा
दरम्यान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 6 महिने पूर्वीच राजीनामा दिला. उर्जित पटेल यांच्या टीममधील महत्त्वाचे अधिकारी म्हणून विरल आचार्य परिचीत होते. राजीनाम्यानंतर विरल आचार्य आता प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत.
विरल आचार्य हे 23 जानेवारी 2017 पासून डेप्युटी गव्हर्नरपद भूषवत होते. गेल्या 30 महिन्यांपासून त्यांनी हे पद सांभाळलं.
गव्हर्नरसोबत मतभेद?
उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाली. मात्र शक्तीकांत दास यांच्या अनेक निर्णयाशी विरल आचार्य सहमत नसल्याचं सांगण्यात येत आहे. महागाई दर आणि विकास दराच्या मुद्द्यावरुन विरल आचार्य आणि शक्तीकांत दास यांच्यात मतभेद होते.
डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांचा राजीनामा
दरम्यान, याआधी डिसेंबर 2018 मध्ये आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाली होती.
सरकारच्या कार्यकाळात तिसरा मोठा राजीनामा
मोदी सरकारच्या कार्यकाळात आरबीआयच्या तीन बड्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी जुलै 2018 मध्ये पद सोडलं. त्यानंतर उर्जित पटेल आणि आता विरल आचार्य यांनी राजीनामा दिला.