Raigad Sahakari Bank Restriction News | भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) रायगड सहकारी बँकेवर (Raigad Sahakari Bank) निर्बंध लादले (Imposed Restriction) आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकाला प्रत्येकी कमाल 15000 रुपये काढता येणार आहे. बँकेला नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही. तसेच ठेव ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर कोणत्याही जुन्या कर्जाला नुतनीकरण करता येणार नाही. गुंतवणूकदारांकडून नव्याने गुंतवणूक करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी याविषयीचे निवेदन दिले आहे, त्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून 15000 रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नाही. रायगड सहकारी बँकेवर हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. निर्बंध लादताना केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध म्हणजे रायगड सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द करणे असा होत नाही. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी बँकेवर लागू असतील. या निर्णयामुळे ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. नियमांचे कसोशिने पालन न करणाऱ्या बँकावर रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उचलला आहे.
रिझर्व्ह बँकेने श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेला ही नियमांकडे कानडोळा केल्याने धारेवर धरले आहे. बँकेला 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फसवणूक वर्गीकरणाशी संबंधित (Fraud Classification) नियमांकडे कानाडोळा करणे या बँकेला महागात पडले आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी सूचना देऊन ही त्याचे पालन झाल्याने केंद्रीय बँक सातत्याने बँकांवर अशी कारवाई करते. आताच केंद्रीय बँकेने बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँकेला दंड ठोठावला. KYC नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने बँकेने ही कारवाई केली.
फेडरल बँकेवर 5.72 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियावर 70 लाख रुपयांचा दंड आरबीआयने ठोठावला आहे. नियम आणि बँकेसबंधीच्या काही मापदंडांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांची माहिती जाणून घ्या (Know Your Customer) या नियमांचे पालन करण्याचे आदेश आरबीआयने दिले होते. मात्र या दोन्ही बँकांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना भूर्दंड सहन करावा लागला. केवायसीच्या नियमांचे पालन न केल्याने गुरुग्राम स्थित धानी लोन्स अँड सर्व्हिसेज लिमिटेड या आर्थिक संस्थेवर 7.6 लाखांचा दंड ठोठावला आहे. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवरही अशीच कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक बँकेवर 1 कोटी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.
या महिन्यात रिझर्व्ह बँकेने द नाशिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेसहीत तीन सहकारी बँकांवर नियमांचे पालन न केल्याने दंड (Penalty) ठोठावला आहे. ही कारवाई या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने एक निवेदन दिले आहे, त्यात फसवणुकीची सूचना आणि त्याची अंमलबजावणी न केल्याने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या(NABARD) निर्देशांचे पालन न केल्याने मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.