मुंबई : क्रेडिट कार्ड (Credit Cards)कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ती 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे (Guidelines) ग्राहकांचे हित अधिक दृढ झाले असून, कार्डाशी संबंधित सर्व प्रकारचे शुल्क (Fees) पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे एक मायाजाल आहे, यामध्ये ग्राहकांच्या खिशाला चाट पडतेच असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. ही एकप्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याचे त्यांचे मत आहे. नव्या गाईडलाइननुसार ग्राहकांच्या मान्यतेशिवाय बॅंका आणि वित्त संस्थाना ग्राहकांच्या माथी क्रेडिट कार्ड मारता येणार नाही. याशिवाय क्रेडिट कार्डची मर्यादाही वाढवता येणार नाही आणि इतर प्रकारच्या ऑफर्सही लागू होणार नाहीत. कार्ड जारी करणाऱ्याने नियम मोडल्यास सदर वित्तीय संस्थेला बिलाच्या दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
आता कार्डधारकांना क्रेडिट कार्डचे थकीत बिल भरण्याची धमकी देता येणार नाही. एखाद्या बँकेने असे केल्यास रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे त्याला तक्रार करता दाखल करता येईल. क्रेडिट कार्डच्या वापराबाबत ‘ईटी नाऊ स्वदेश’शी बोलताना Subramanian.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यन म्हणाले की, ही अतिशय सुलभ गोष्ट आहे. हे एखाद्या सुरीसारखे आहे जे डॉक्टर जीव वाचवण्यासाठी आणि कसाईचा जीव घेण्यासाठी वापरतात. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला, तर ती अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे.
फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे एक मायाजाल आहे, यामध्ये ग्राहकांच्या खिशाला चाट पडतेच असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. ही एकप्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. एक म्हणजे जॉइनिंग फी आणि दुसरे क्रेडिट कार्ड घेतल्यावर वार्षिक शुल्क. कार्ड घेण्यापूर्वी, काय ऑफर्स आहेत आणि काय सवलत मिळत आहे हे निश्चितपणे जाणून घ्या.
अनेकदा असे होते की तुम्हाला मोफत क्रेडिट कार्ड दिले जात असल्याचे सांगितले जाते. जॉइनिंग फी तुम्हाला माफ करण्यात आल्याचे सांगितले जाते. जॉइनिंग फीबरोबरच पहिल्या वर्षाची फीही माफ करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु, त्या पुढील वर्षापासून तुम्हाला हे शुल्क जमा करावे लागते. दुसरे म्हणजे लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड असते, ज्यामध्ये असे सर्व शुल्क माफ केले जाते.
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून नेहमीच तक्रार असते की त्यांना चार्जबद्दल योग्य माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांचे हित जपतानाच रिझर्व्ह बँकेने पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला आहे. या परिपत्रकानुसार क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्यांना वार्षिक शुल्काबाबतची माहिती शेअर करावी लागणार आहे. कार्ड इश्यूरला किरकोळ खरेदी, बॅलन्स ट्रान्सफर, कॅश अॅडव्हान्स, किमान पेमेंट न भरणे, विलंब देयक शुल्कासह अन्य प्रकारचे शुल्क याबाबत सविस्तर माहिती शेअर करावी लागणार आहे.