PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा
इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या वृत्तानुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांच्या सहकारी बँकेचं खातं पीएमसी बँकेत आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. परिणामी खातेदारांची घालमेल सुरु झाली आहे. पीएमसी बँकेबाहेर दररोज खातेदारांच्या रांगा लागत आहेत. एकीकडे सर्वसामान्य खातेदारांचे पैसे अडकले असताना, रिझर्व्ह बँकेचे अधिकारीही मागे पडले नाहीत. आरबीआयच्या अधिकाऱ्यांचेही पैसे पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत (PMC Bank) अडकले आहेत.
इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या वृत्तानुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांच्या सहकारी बँकेचं खातं पीएमसी बँकेत आहे. त्या खात्यात 105 कोटी रुपयांची मुदत ठेव आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या को ऑप क्रेडिट सोसायटीच्या 2019 च्या ताळेबंदानुसार, पीएमसी बँकेत 105 कोटी रुपयांची मुदत ठेव आहे. या सोसायटीचे सभासद हे आरबीआयचे अधिकारी आहेत. आरबीआय स्टाफ आणि अधिकारी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचीही एफडी या बँकेत आहे. मात्र त्यांची मुदत ठेव किती कोटींची आहे याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.
1 हजारावरुन 10 हजार
दरम्यान, आरबीआयच्या निर्बंधामुळे एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येत होते. मात्र 26 सप्टेंबर म्हणजे आजपासून ही मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे 6 महिन्यातून एका खातेदाराला 10 हजार रुपये काढता येतील. हे दहा हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता. पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.
मॅनेजिंग डायरेक्टर निलंबित
दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को आप बँकेचे मॅनेजिंग डायरेकटर जॉय थॉमस यांना बँकेने निलंबित केलं आहे. रिझर्व्ह बँकेमार्फत नियुक्त प्रशासकांनी थॉमस यांना निलंबित केलं.
खातेदारांवर निर्बंध काय?
- एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येत होते, ते आता 10 हजार रुपये करण्यात आले आहेत.
- तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.
- जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल
- कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.
बँकेवर कोणकोणते निर्बंध?
- रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही
- जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही
- बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही
- नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत
- बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही
- कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल
- वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही
संबंधित बातम्या
पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, खातेदारांना महिन्याला 1 हजार रुपयेच काढता येणार
पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग
या 9 बँका बंद होणार असल्याचा मेसेज खोटा, आरबीआयचं स्पष्टीकरण