Auto Sales : कुठे आहे मंदी? नोव्हेंबर महिन्यात देशात वाहनांची विक्रमी विक्री, ग्रामीण भागातून सर्वाधिक मागणी, कोट्यवधींची झाली उलाढाल..
Auto Sales : मंदीच्या केवळ बाताच, वाहन विक्रीने मंदीने केला टाटा..
नवी दिल्ली : जगभरात मंदीचे (Global Recession) वादळ घोंगावत आहे. मंदीची सुरुवात झाल्याचा काहींचा दावा आहे, तर काही जण पुढील वर्षी मंदीचा सामाना करावा लागणार असल्याचा अंदाज बांधत आहेत. पण भारतातील वाहन उद्योगाने मंदीचा पोपट केला आहे. ऑटो सेल्सच्या (Auto Sales) आकड्यांनी बाजारात जान आणली आहे. वाहन विक्रीच्या आकड्यांनी नवीन विक्रम रचला आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात वाहन विक्री जोरदार झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) याविषयीचा रिपोर्ट दिला आहे. शुक्रवारी त्यांनी वाहनांच्या किरकोळ विक्रीचे आकडे जारी केले आहे. त्यानुसार, गेल्या महिन्यात, नोव्हेंबरमध्ये साडे 18 लाख दुचाकींची विक्री झाली. यामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मागणी आल्याचे समोर आले आहे.
भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात नवीन इतिहास रचला गेल्या. त्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वाधिक वाहनांची विक्री झाली. मार्च 2022 मध्येही अशीच विक्री झाली होती. बीएस-4 ऐवजी आता बीएस-6 चारचाकी आल्याने त्यांची विक्री वाढली. वर्षाआधारीत किरकोळ विक्रीत 26 टक्के वाढ झाली.
वाहनांच्या सर्वच श्रेणीत विक्री वाढली आहे. यामध्ये विक्रीत दुचाकीत 24%, तीनचाकीमध्ये 80%, खासगी चारचाकी 21% तर व्यावसायिक वाहनांमध्ये 33% वाढ नोंदविण्यात आली. लग्न सराई असल्याने वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आकड्यांनुसार, नोव्हेंबर महिन्यात एकूण 23 लाख 80 हजार 465 वाहनांची विक्री करण्यात आली. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या 18,47,708 इतकी होती. ग्रामीण भागातून वाहनांची मागणी वाढली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 18,93,647 वाहने विकल्या गेली होती. त्यात दुचाकींची संख्या 14,94,797 इतकी होती.
प्रमुख ऑटो कंपन्या मारुती सुझुकी इंडिया, हुदांई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या विक्रीचा आकडा दुप्पट अंकी झाला आहे. किआ इंडिया, होंडा कार्स, स्कोडा आणि एमजी मोटरने पण गेल्या महिन्यात विक्रीत जोरदार मुसंडी मारली.