मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झाली नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर व्यवसायिक गॅस सिलिंडरचे (Gas Cylinder) दर प्रति सिलिंडर 2021 रुपयांवर पोहोचले आहेत. कपात करण्यापूर्वी गॅस सिलिंडरचे भाव 2,219 रुपये इतके होते. गेल्या महिन्यात देखील गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. जून मध्ये गॅस कंपन्यांनी व्यवसायिक सिलिंडरच्या दारत 136 रुपयांची कपात केली होती. सलग दोन महिने व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हॉटेलमधील पदार्थ स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2,021 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर 2,140 रुपयांवर पोहोचले आहेत. ते पूर्वी 2,322 रुपये एवढे होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,981 रुपये एवढी आहे. तर चेन्नईमध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2,186 रुपये झाली आहे. कपातीपूर्वी चेन्नईमध्ये एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी 2,373 रुपये मोजावे लागत होते.
दरम्यान आता नवे गॅस कनेक्शन घेणे सुद्धा महाग झाले आहे. जर तुम्हाला नव्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घ्यायचे असेल तर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गॅस कंपन्यांकडून व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या कनेक्शन दरात प्रति कनेक्शन 1,050 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी व्यवसायिक गॅस सिलिंडरचे कनेक्शन 2,550 रुपयांना मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन ते 3,600 रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र गेले दोन महिने व्यवसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅसच्या किमती कमी होत असल्याने हॉटेलमधील जेवण देखील काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे.