..अब ‘मार्केट’ मुट्ठी मैं; रिलायन्सच्या आयपीओची लवकरच एन्ट्री, रेकॉर्डब्रेक गुंतवणूक!
रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचा प्रत्येक आयपीओ 50,000 ते 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. रिलायन्स समूह दोन्ही कंपन्यांचे शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या विचारात आहे.
नवी दिल्लीः मुकेश अंबानींच्या मालकीच्या दोन कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) होण्याची वाटेवर आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या सहाय्यक कंपन्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचे आयपीओ बाजारात डेरेदाखल होऊ शकतात. हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार रिलायन्स समूहाचा (RELIANCE GROUP) दोन कंपन्यांचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ (TOP IPO IN INDAI) ठरण्याची शक्यता आहे. संभाव्य आयपीओ एलआयसीच्या 21 हजार कोटी रुपयांच्या आयपीओहून अधिक असण्याची शक्यता आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मतानुसार, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचा प्रत्येक आयपीओ 50,000 ते 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. रिलायन्स समूह दोन्ही कंपन्यांचे शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या विचारात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आगामी वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी (MUKESH AMBANI) घोषणा करण्याची शक्यता आहे. केवळ भारतातच नव्हे रिलायन्स जिओचा आयपीओ अमेरिकेच्या Nasdaq मध्ये सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे.
आधी रिटेल नंतर जिओ-
रिलायन्स समूह सर्वात पहिल्यांदा रिलायन्स रिटेलचा आयपीओ बाजारात आणेल. त्यानंतर रिलायन्स जिओचा शेअर सूचीबद्ध करण्याचा विचार केला जाईल. कंपनी डिसेंबर 2022 पर्यंत लिस्टिंगचे काम पूर्ण करेल.
आजवरचे टॉप-3 आयपीओ:
· पेटीएम (2021) 18,300 कोटी
· कोल इंडिया (2010)15,000 कोटी
· रिलायन्स पॉवर (2008) 11,700 कोटी
रिलायन्स रिटेल-
रिलायन्स रिटेल ही भारतातील रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. 2006 मध्ये कंपनीची स्थापना झाली असून महसुलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी ठरली आहे.
रिलायन्स जिओ-
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही LTE सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने वायरलेस कम्युनिकेशन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सार्वभौमत्वाखालील उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. रिलायन्स जिओचं देशभरात 4-जी नेटवर्कचं जाळ विस्तारलं आहे.
आयपीओ म्हणजे काय?
इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे आयपीओ. यासाठी कंपन्या शेअर बाजारमध्ये स्वत:ला लिस्टेड करून शेअरमध्ये गुंतवणूकदारांना विकण्यासाठी प्रस्ताव आणतात. शेअर बाजारात लिस्टेड झाल्यामुळे कंपनीच्या बाबतीत विस्तृत माहिती सार्वजनिक होते.