महागाईने (Inflation) अनेक क्षेत्रात हनुमान उडी घेतल्याने, या अनपेक्षित धक्क्यांनी गांगरलेल्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) पुन्हा एकदा महागई दराचा नवा आकडा जनतेसमोर मांडला आहे. चालु आर्थिक वर्षात तिस-यांदा भूमिका बदलण्याची नामुष्की केंद्रिय बँकेवर ओढावली आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महागाई दर 4.5 टक्के असल्याचा दावा करणा-या आरबीआयने आता पुन्हा नवीन महागाई दराचा अंदाज वर्तवला आहे. महागाई दर 6.7 टक्के इतका असेल, असा अंदाज आता बँकेने बांधला आहे. आता या बांधा-बांधित बँक हवेत तर गोळीबार करत नाही ना, इतपत शंका तज्ज्ञांना येऊ लागली आहे. तिस-यांदा भूमिका बदलवून बँकेने सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. महागाई कमी करण्यासाठी बँकेने अवलंबिलेल्या उपाय योजना तोकडया पडत आहे. महागाईने आकाशाला गवसणी घातली आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे अर्थव्यवस्था (Economy) रुळावर घसरलेली आहे. आता सरकार विविध उपाय योजना करुन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करत असताना महागाईने सरकारला जेरीस आणले आहे. एकूणच पाहता येत्या काही दिवसात सरकारला वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन पळ काढता येणार नाही, असे दिसते.
जागतिक बँकेने (World Bank) जागतिक अर्थव्यवस्थाचा वृद्धी दराचा अंदाज घटविला आहे. पूर्वी वृद्धी दर 4.1 टक्के असण्याचा कयास होता, तो आता 2.9 टक्के गृहित धरण्यात आला आहे. 38 देशांच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने(OECD) ही हा विकास दर 4.5 टक्क्यांहून 3 टक्क्यांवर आणला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर 3.6 टक्के असेल असा अंदाज बांधला आहे. जागतिक बँकेने ही वृद्धी दर घटविला आहे. 8.7 टक्क्यांहून वृद्धी दर 7.5 टक्के असेल असे स्पष्ट केले आहे. तर OECD ने वृद्धी दराचे अनुमान 8.1 टक्क्यांहून घटवत 6.9 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था कोमात गेल्या होत्या. अर्थव्यवस्थांना बळकटी देण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी खेळते भांडवल सहज उपलब्ध होण्यासाठी व्याजदरात कपात केली होती. परंतू अतिरिक्त भांडवलाने महागाईचा भडका उडाला. आता अर्थव्यवस्थेची डागडुजी करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला आणि तो अंमलबजावणीत आणला. भारतीय रिझर्व्ह बँकेने 35 दिवसांत व्याजदरात 90 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. खेळत्या भांडवल्याच्या कमतरतेमुळे वृद्धी दरावर थेट परिणाम झाला आहे. गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहे आणि त्यांनी गुंतवणूक कमी केली आहे.
चालू आर्थिक वर्षात (2022-23) रिझर्व्ह बँकेने त्यांचा अंदाज तिस-यांदा बदलला आहे. सर्वात अगोदर महागाई दर हा 4.5 टक्के होता. त्यात बदल होऊन तो 5.7 टक्क्यांवर पोहचला. वित्त धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने महागाईचा दर 6.7 टक्क्यांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या इंधन दरांमुळे आणि रशिया-युक्रेनमधील तणावामुळे सध्या तरी महागाईपासून सर्वसामान्यांची सूटका होईल असे दिसत नाही.