India : ब्रिटनमध्ये ऋषी, अमेरिकेत कमला, भारताला कुठे कुठे होईल फायदा..
India : जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे नेते आहेत, भारताला त्याचा काय होईल फायदा..
नवी दिल्ली : चित्र अगदी स्पष्ट आहे. ब्रिटनचा कारभार आता ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या हाती आहे. तर अमेरिकेत दुसऱ्या क्रमांचे पद कमला हैरिस (Kamala Harris) यांच्याकडे आहे. हे दोन्ही नेते भारतीय वंशाचे आहेत. या दोन्ही नेत्यांचे भारतीय भूमीशी असलेले कनेक्शन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर (International Level) चर्चेचा विषय झाला आहे. जागतिक मीडियाने या नवीन समीकरणामुळे भारताचे जगात सामर्थ्य वाढेल असा अंदाज वर्तविला आहे.
ऋषी सुनक हे तर इन्फोसिस कंपनीचे सह संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthi) यांचे जावाई आहेत. त्यांची मुलगी अक्षता सोबत सुनक यांनी लग्नगाठ बांधलेली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे जागतिक मीडियाचे लक्ष्य वेधल्या गेले आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनक यांना तात्काळ शुभेच्छा दिल्या. एवढ्यावरच न थांबता पंतप्रधानांनी लागलीच जागतिक मुद्दे, 2030 रोडमॅप यावर ब्रिटनसोबत काम करण्याची तयारीही दर्शविली.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनेच पंतप्रधान म्हणून इतिहास घडविला आहे. ऐन दिवाळीच्याच दिवशी ही शुभ वार्ता भारतीयांना मिळाली. यापूर्वी कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्या, तेव्हा त्यांचे भारतीय कनेक्शन चर्चेचा विषय ठरले.
आता भारताच्या व्यापार आणि परराष्ट्रीय भूमिकेला पाठबळ मिळेल का? यावरुन सध्या गरमागरम चर्चा झडत आहेत. देशातील व्यापाऱ्यांना या नवीन घडामोडी भारताच्या पथ्यावर पडतील असे वाटत आहे.
या दोन्ही भारतीय वंशाच्या नेत्यांकडून भारताला पाठिंबा आणि पाठबळ मिळू शकते अशा चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चिल्या जात आहेत. पण या केवळ चर्चाच आहेत. अजून ठोस असे काही निष्पन्न झालेले नाही.
हे दोन्ही नेते त्यांच्या देशाचे हितसंबंध जपतील. त्यांच्या देशाचा फायदा पाहतील असा एका गटाचा दावा आहे. सुनक आणि हॅरीस हे त्यांच्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ते पहिले प्राधान्य त्यांच्या देशाला देतील हे स्पष्ट आहे.
तरीही आंतरराष्ट्रीय कुटनिती ठरविताना भारताच्या भूमिकेला आता व्यापक पाठबळ मिळेल, याची दाट शक्यता आहे. अमेरिका आणि ब्रिटनशिवायही जग फार मोठे आहे आणि त्यात भारताच्या भूमिकेला जागतिक समुदायाने अनेकदा पाठबळ दिलेले आहे. एकेकाळी भारताने तिसऱ्या जगाचेही नेतृत्व केलेले आहे.