मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude oil price) दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. कच्चे तेल 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. युरोपीयन युनियनने रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात वाढच होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानने कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. मात्र दुसरीकडे भारतात कच्च्या तेलाचे दर वाढून देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जाहीर झालेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा (Petrol) दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. गेल्या सहा एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यात सर्वात महाग पेट्रोल हे परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 106 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव अनुक्रमे 121.30 व 104.50 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.20 तर डिझेलचा दर 103.10 रुपये आहे. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. तर नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.40 रुपये आहे, तर डिझेलचा दर 103.73 रुपये लिटर आहे.
22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. मात्र सहा एप्रिलपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर वाढत असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.