नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोना (Corona) महामारी आणि रशिया-युक्रेनच्या वादात अडकले आहे. अशावेळी भारताने एक मोठे धोरण आखले आहे. त्यामुळे जागतिक व्यवहारात भारतीय चलन, रुपयाला (Indian Rupee) महत्व येणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन (International Currency) म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करत आहे. भारताच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल.
WION या संकेतस्थळानुसार, आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने भारतीय रुपयाला पसंती दिली आहे. श्रीलंकेने रुपी ट्रेडिंग खाते सुरु केले आहे. या खात्याला वास्त्रो खाते (Vostro Accounts) पण म्हटल्या जाते. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने भारतीय रुपयाला विदेशी चलन म्हणून मान्यता दिली आहे.
या प्रयत्नांमुळे श्रीलंकन नागरिकाला 8 लाख 26 हजार 823 रुपये म्हणजे 10 हजार अमेरिकन डॉलर रोख ठेवता येईल. याचा अर्थ आता श्रीलंकन नागरीक आणि व्यापारी डॉलर ऐवजी भारतीय रुपयामध्ये सहज व्यापार करु शकता आणि खरेदी-विक्रीसाठी भारतीय चलनाचा वापर करु शकतील.
केंद्र सरकारने या वर्षी जुलै महिन्यात ही महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे. अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार पूर्ण करता येतील, सेटलमेंट पूर्ण करता येईल.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. RBI ने आतापर्यंत 18 वास्त्रो खाते (Vostro Accounts) सुरु केली आहेत. यामध्ये रशियासाठी 12, श्रीलंकेसाठी 5 तर मॉरिशससाठी 1 खात्याचा समावेश आहे. या तीन देशांमध्ये भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरता येणार आहे.
आता या तीन देशांनंतर जगभरातील अनेक देशांनी भारतीय चलनाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन डॉलरची कमतरता भासत असल्याने हे देश भारतीय चलनाकडे वळाले आहेत. यामध्ये तजाकिस्तान, क्युबा, लक्झेंबर्ग, सूडान या देशांचा समावेश आहे.