युद्धाच्या संघर्षझळा: युक्रेनची अन्नधान्य निर्यातीला बंदी, ताटातला घास महागणार
देशांतर्गत नागरिकांच्या अन्नाची व जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी युक्रेनने धान्याच्या निर्यातीवर बंदी (Export Ban) घातली आहे. युक्रेनने घेतलेल्या निर्णयामुळे अन्नधान्य पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine Crisis) संघर्षामुळं सर्वसामान्यांना अन्नाचा घास महाग होणार आहे. जगभरात अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगाला सर्वाधिक अन्नधान्याचा पुरवठा युक्रेनमधून केला जातो. मात्र, येत्या काळात देशांतर्गत नागरिकांच्या अन्नाची व जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी युक्रेनने धान्याच्या निर्यातीवर बंदी (Export Ban) घातली आहे. युक्रेनने घेतलेल्या निर्णयामुळं अन्नधान्य पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारतासह आशिया खंडातील प्रमुख राष्ट्रांना अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरं जाव लागू शकतं. यूक्रेनला अन्नधान्याचं कोठार मानलं जातं. जगभरातील राष्ट्रांना युक्रेनमधून अन्नधान्यासह खाद्यतेल आदींचा पुरवठा केला जातो. त्यामुळे गहू (Wheat), मका, खाद्य तेल आदींच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यूक्रेन सरकारचा ‘रेड सिग्नल’
यूक्रेन सरकारने गहू सहित अनेक अन्नधान्याच्या निर्यातीवर प्रतिबंध केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्ध अधिक काळ चालल्यास देशांतर्गत नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी यूक्रेनने अन्नधान्याचा साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आठवड्यात युक्रेन सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार, बाजरी, साखर, गहू तसेच जीवनपयोगी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अभूतपूर्व मानवी संकटाच्या काळात देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्यातीवर प्रतिबंधाची आवश्यकता असल्याचं यूक्रेन सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.
भारतातून निर्यातीचा ओघ
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत गव्हाचे भाव देखील वाढले आहे. ही सर्व परिस्थिती भारताला गव्हाच्या निर्यातीसाठी अनुकूल आहे. भारतातून गव्हाची निर्यात वाढत असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत 6.6 मिलियन टन गव्हाची निर्यात करण्यात आली आहे. भारत रशियानंतर जागातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे.
रशिया – युक्रेनची निर्यात ठप्प
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात ठप्प झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेनचा गव्हाच्या उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक लागतो. भारत रशियानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी रशिया आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होते. दोन देश मिळून जवळपास जागतिक स्थरावर तीस ते चाळीस टक्के गव्हाची निर्यात करतात. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने निर्यात ठप्प आहे. या सधींचा भारताला फायदा होऊ शकतो. भारतातून गव्हाची निर्यात वाढत आहे.
इतर बातम्या :
Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला
GOLD RATE UPDATE: 54 हजारांचा टप्पा पार! मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं, जाणून घ्या- ताजे भाव