Share Market : या सरकारी कंपनीने पालटले नशीब, गुंतवणूकदारांना कमाईचा मौका
Share Market : सरकारी कंपन्यांनी या काही वर्षात जोरदार भरारी घेतली आहे. चंद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मुळे तर काही सरकारी कंपन्यांची चांदीच चांदी झाली. त्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्या. आता केंद्र सरकार या सरकारी कंपनीतील जवळपास 5 टक्के हिस्सा विक्री करत आहे. कंपनीचा शेअर कमाल करण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.
नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : गुंतवणूकदारांसाठी कमाईचा आणखी एक मौका मिळाला आहे. अनेक सरकारी कंपन्यांनी (Government Company) गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे. चंद्रयान 3 आणि आदित्य एल 1 या मोहिमांनी तर काही सरकारी कंपन्यांना चारचांद लागले. त्यांची चांदीच चांदी झाली. या कंपन्यांना परदेशातून मोठंमोठ्या ऑर्डर मिळाल्या. केंद्र सरकार या सरकारी कंपनीतील जवळपास 5 टक्के वाटा विक्री करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचा शेअर (Share Market) बुधवारी 6.78 टक्क्यांनी तेजीत होता. हा शेअर 81.75 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांच्या मते, या घडामोडींमुळे हा शेअर लवकरच कमाल करु शकतो. कोणता आहे हा शेअर, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?
या कंपनीतील हिस्सा विकणार
केंद्र सरकार, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जेनरेटर कंपनी एसजेवीएन लिमिटेड (SJVN Ltd.) मधील 4.92 टक्के हिस्सा विक्री करणार आहे. ऑफर फॉर सेल म्हणजे ओएफएस (OFS) माध्यमातून ही विक्री होईल. त्यासाठी 69 रुपये प्रति शेअर अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. बुधवारी बाजार बंद होताना या शेअरचा जो भाव होता. त्यापेक्षा ही किंमत 15.6 टक्के कमी आहे. बुधवारी 6.78 टक्क्यांनी तेजीत होता. हा शेअर 81.75 रुपयांवर बंद झाला.
किती होईल फायदा
केंद्र सरकार या कंपनीतील 4.92 टक्के हिस्सेदारी विक्री करत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत एकूण 1,600 कोटी रुपये जमा होतील. SJVN Ltd कंपनी पूर्वी सतलज जल विद्यूत निगम या नावाने ओळखली जायची. या कंपनीची स्थापना 1988 मध्ये भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारने संयुक्त उपक्रमाआधारे केली होती.
गुंतवणूकदारांना संधी
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडेय यांनी या विक्रीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्यानुसार एसजेव्हीएन विक्री सुरु होईल. किरकोळ गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल. शुक्रवारी किरकोळ गुंतवणूकदार बोली लावू शकतात. केंद्र सरकार चांगली बोली आल्यास 2.46 अतिरिक्त विक्रीच्या पर्यायासह 4.92 टक्के विक्री करु शकते.
या वर्षात 135% तेजी
जून तिमाहीतील आकड्यानुसार, केंद्र सरकारची कंपनीत 86.77 टक्के हिस्सेदारी आहे. 4.92 टक्के वाटा विकल्यानंतर सरकारकडे या कंपनीत 81.85 टक्के हिस्सेदारी असेल. नियमानुसार, सार्वजनिक कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 75 टक्क्यांहून अधिक नसते. सरकारची 21 सार्वजनिक उपक्रमांमध्ये 75 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे. अतिरिक्त वाटा विक्रीतून केंद्र सरकारला 1.9 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल. एका वर्षात या शेअरमध्ये 135 टक्के तेजी आली. यावर्षी या शेअरमध्ये 100 टक्के उसळी आली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.