नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : अयोध्येतच नाही तर देशभरात राम मंदिर प्राण प्रतिष्ठपणेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा सोहळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. 22 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होईल. त्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. तर अयोध्येतील विकास कामांना पण वेग आला आहे. त्याचा फायदा येथे काम करणाऱ्या कंपन्यांना पण होत आहे. या कंपन्यांचे शेअर सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. कोणती आहे ही कंपनी, कसा झाला गुंतवणूकदारांना फायदा?
शेअरमध्ये 20 टक्के उसळी
अयोध्येत अनेक विकास कामे सुरु आहेत. तर भाविका भक्त, पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करणाऱ्या या कंपनीला पण त्याचा फायदा झाला आहे. अपोलो सिंदुरी हॉटेल्सचा शेअर 20 टक्क्यांनी उसळला आहे. बीएसईवर या शेअरने कमाल केली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे.
हॉस्पिटॅलिटी सेक्टरची कंपनी
काही दिवसांपूर्वी हा शेअर 1996 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने बाजारात 15 टक्क्यांची मुसंडी मारली. हा शेअर 2300 रुपयांपर्यंत पोहचला. या स्टॉकने 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी बजावली. तर दुपारनंतर हा शेअर 20 टक्क्यांच्या तेजीसह 2,395.95 रुपयांवर व्यापार करत होता. अपोलो सिंदुरी हॉटेल्स ही हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील कंपनी आहे.
5 दिवसांत 56 टक्के उसळी
अपोलो सिंदुरी हॉटेलचा शेअर गेल्या पाच दिवसांत 56 टक्क्यांनी उसळला. तर एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 51 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 71 टक्क्यांनी वधारला. आज, गुरुवारी सकाळी 11:50 मिनिटांना हा शेअर 2,562.50 रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअरने 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी पुन्हा बजावली. या शेअरची निच्चांकी कामगिरी 1020 रुपये आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत शेअर निच्चांकावर होता.
हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये तेजीचे सत्र
अयोध्येत गेल्या दोन वर्षांत भाविक आणि पर्यटकांची रीघ लागली आहे. कोट्यवधी भाविक अयोध्येला येऊन गेले आहेत. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये तेजीचे सत्र आले आहे. या संबंधित अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहेत. भविष्यात हे स्टॉक अजून उसळी घेतील.