नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : देशात सध्या क्रिकेट विश्वचषकाचे (ICC World Cup 2023) वारे वाहत आहे. त्याचा फायदा भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांना होताना दिसत आहे. काही कंपन्यांच्या शेअरने मोठी भरारी घेतली आहे. फूड डिलिव्हरी (Food Delivery Stock) करणाऱ्या या स्टॉकमध्ये तर 8 टक्क्यांची तेजी आली आहे. बुधवारच्या व्यापारी सत्रात या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा शेअर अजून कमाल करण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपचा महोत्सव अजून एक महिना रंगणार आहे. त्यामुळे या शेअरमध्ये अजून मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. खासकरुन भारताचा सामना ज्या दिवशी असेल, त्यादिवशी हा शेअर कमाल करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोणता आहे हा स्टॉक?
Zomato च्या शेअरची भरारी
झोमॅटोच्या शेअरमध्ये बुधवारी 2 टक्क्यांची तेजी दिसून आली. आकड्यानुसार, मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर 3.15 मिनिटाला 2.50 टक्क्यांनी चढला. तो 108.75 रुपयांवर व्यापार करत होता. कंपनीचा शेअर आज 106.90 रुपयांवर उघडला. तर एक दिवसापूर्वी हा शेअर 106.10 रुपयांवर बंद झाला. येत्या वर्षभरात हा स्टॉक नवीन रेकॉर्ड करणार असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञ करत आहेत.
52 आठवड्यांचा गाठला उच्चांक
सध्याच्या तेजीसह झोमॅटोच्या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीने पहिल्या सत्रात मोठी झेप घेतली. हा शेअर 109.05 रुपयांवर पोहचला. या शेअरने गेल्या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील निच्चांकी कामगिरी 44.35 रुपये आहे. यावर्षी 25 जानेवारी रोजी ही घसरण आली होती. तेव्हापासून या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 146 टक्के परतावा दिला आहे.
कंपनीला 7100 कोटींचा फायदा
विश्वचषक सुरु झाल्यापासून कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. कंपनीच्या भांडवलात 7,142 कोटींची वाढ दिसून आली. 4 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर बाजार बंद होताना 100 रुपयांच्या स्तरावर होता. त्यावेळी कंपनीचे बाजारातील भांडवल 86,689.79 कोटी रुपये होते. आता कंपनीने 52 आठवड्यातील उच्चांक गाठल्यानंतर मार्केट कॅप 93,831.48 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.