नवी दिल्ली : चीनमधील (China) कोविडची स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, तेलाच्या किंमती (Crude Oil), डॉलर निर्देशांक या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून येईल. वर्षाच्या दुसऱ्या दिवशी बाजाराची सुरुवात होत आहे. सरत्या वर्षात बाजाराने अनेक चढउतार पाहिले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) पळ काढला आणि पुन्हा बाजारावर निष्ठा दाखवली. वर्षाच्या सुरुवातीला या आठवड्यात विविध घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम दिसून येणार आहे.
सॅमको सिक्युरिटीजचे बाजार प्रमुख अपूर्व शेठ यांनी भारतीय बाजार आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार त्याला प्रतिक्रिया देईल. या आठवड्याच्या शेवटी फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या(FOMC) बैठकीतील नोंदी सार्वजनिक करण्यात येईल. या सर्वांचा परिणाम बाजारावर दिसून येईल.
स्वस्तिक इन्वेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर यांनी विश्लेषण केले आहे. त्यानुसार, पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 2024 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी यंदा केंद्रातील सरकार त्यांचा अंतिम अर्थसंकल्प सादर करेल.
चौथ्या तिमाहीचे अंदाज, मासिक ऑटो विक्रीचा लेखाजोखा सादर होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव, रुपयाची अवस्था, तसेच इतर अनेक घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून येईल. या महत्वपूर्ण बाबींकडे गुंतवणूकदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
आगामी अर्थसंकल्प, कोरोनाची भीती या मुद्दांकडेही बाजारातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते या बाबींचा मोठा परिणाम दिसून येईल. प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांवर घडामोडींचा परिणाम दिसून येईल. त्यानुसार कंपन्यांचा व्यापार प्रभावित होईल. फायदा आणि नुकसान त्यानुसार दिसून येईल.
आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला. बाजारावर विविध घटकांचा परिणाम झालेला असतानाही सेंसेक्सने रेकॉर्ड तोडले. बीएसईने 63,000 अंकांचा सर्वकालीन नवीन उच्चांक गाठला. या नवीन विक्रमामुळे हा जगातील दुसरा सर्वात चांगली कामगिरी बजाविणारा शेअर निर्देशांक झाला आहे. निफ्टीनेही दमदार कामगिरी बजावली आहे.