Share Transfer Rules : शेअर बाजारात होणार हा मोठा बदल, सेबीने टाकले पाऊल
Share Transfer Rules : शेअर बाजारात अनेक बदल होत आहे. डिमॅट खात्यात पैसे जमा होण्याचा कालावधी कमी झाला आहे. आता तर शेअर बाजाराचे सत्र संपल्यानंतर काही तासातच पैसा खात्यात जमा होईल. गुंतवणूकदारांसाठी आणखी एक खास नियम लागू होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आणि त्याच्या नातेवाईकांना मोठा फायदा होईल.
नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : भारतीय शेअर बाजार हायटेक (High-tech Share Market) होत आहे. जगभरातील बाजारांपेक्षा भारतीय शेअर बाजाराने एक पाऊल पुढे टाकले आहे. यावर्षी तर अनेक बदलाची नांदी आली आहे. T+1 नियमाने सेटलमेंटचा कालावधी कमी केला आहे. काही दिवसात तर हा कालावधी अवघ्या काही तासांचा असेल. ट्रेडिंग संपल्यानंतर काही तासाच सेटलमेंटची रक्कम खात्यात येईल. पण आता आणखी एक नियम बदलणार आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. सेबीने (SEBI) त्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्याची रंगीत तालीम सुरु आहे. लवकरच हा नियम लागू होईल. त्याचा गुंतवणूकदारांसह त्यांच्या नातेवाईकांना फायदा होईल. काय होणार हा बदल?
नवीन वर्षापासून बदल
ईटीतील एका वृत्तानुसार, बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांसाठी हा खास नियम आणण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, त्याचे शेअर त्याच्या वारसदारांच्या अथवा नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरीत करता येईल. त्यासाठीचा आरखडा तयार करण्यात आला आहे. त्याची रंगीत तालीम पण सुरु होईल. त्रुटी दूर करण्यात येत आहेत. पुढील वर्षी हा नियम लागू होईल. त्यामुळे नातेवाईकांना या कारणासाठी नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही. त्यांना शेअरवर सहज दावा सांगता येईल. तसेच शेअरचे हस्तांतरण पण सोपे होईल. किचकट प्रक्रिया संपेल आणि एकदम सहजरित्या ही प्रक्रिया पूर्ण होईल.
अनेक दिवसांपासून होती मागणी
रिपोर्टनुसार, त्यासाठी एक केंद्रीय व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज होईल. तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता असले. सध्या गुंतवणूकदाराचा मृत्यू ओढावल्यास शेअर हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार सेबीकडे या नियमात बदलाची मागणी करत होते. त्यांना नियमात सुटसुटीतपणा हवा होता. खासकरुन रिटेल सेक्टरमध्ये सेबीकडे नियम सोपे करण्याची मागणी करण्यात येत होती. सेबीने त्यावर काम सुरु केल्याने गुंतवणूकदारांचा फायदा होईल.
आता प्रक्रिया होईल सोपी
नवीन व्यवस्थेत ही प्रक्रिया सोपी करण्यात येईल. नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर वारसांना गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्याचे कळवावे लागेल. तुमच्या ब्रोकर फर्म मार्फत ही प्रक्रिया पूर्ण होईल. तुमचे खाते ज्या ब्रोकरचे असेल त्याला ही वार्ता कळवावी लागेल. त्यानंतर स्टॉक ब्रोकर पोर्टफोलिओ मॅनेजरच्या माध्यमातून हे शेअर वारसदाराच्या नावे हस्तांतरीत करण्यात येतील.