एक 6.90 लाखाला तर दुसरी 5.80 लाखांना झाली विक्री; 10 रुपयांच्या नोटेसाठी का मोजली असेल इतकी रक्कम
10 Rupees Note Auction : लंडनमध्ये एका लिलावात भारताच्या 10 रुपयांच्या नोटेला लाखो रुपयांची किंमत मिळाली. यामध्ये एक नोट 6.90 लाख रुपये तर दुसरी नोट 5.80 लाख रुपयांना विक्री झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दहा रुपयांच्या नोटेला इतका भाव का बरं दिला असेल?
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये जगभरातील अनेक देशांच्या नोटा, चलनाचा लिलाव झाला. या लिलावात विविध देशाचे अत्यंत जुन्या नोटांची विक्री करण्यात आली. यामध्ये भारताच्या पण काही नोटांचा समावेश होता. यामध्ये 10-10 रुपयांच्या दोन नोटांना सोन्यासारखा भाव मिळाला. या नोटांना 2.7 लाख रुपयांपर्यंत किंमत मिळण्याचा अंदाज होता. पण हा अंदाज मोडीत निघाला. या नोटांना जबरदस्त भाव मिळाला. त्याची एकच चर्चा रंगली आहे.
मिळाली जबरदस्त किंमत
या नोटांचा लिलाव मेफेअरमध्ये नूनन्स ही संस्था करत आहे. ही संस्था 1990 च्या दशकापासून जुन्या नोटा, शिक्के, दाग-दागिने आणि मेडल्सचा लिलाव करते. या लिलावात भारताच्या अनेक नोटांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 10-10 रुपयांच्या दोन नोटा आहेत. या दोन्ही नोटा 106 वर्ष जुन्या आहेत. यातील एक 10 रुपयांची नोट 6,500 पाऊंड म्हणजे 6.90 लाख तर दुसरी 10 रुपयांची नोट 5,500 पाऊंड म्हणजे 5.80 लाख रुपयांना विक्री झाली.
काय खास आहे या नोटांमध्ये
10-10 रुपयांच्या या दोन नोटा एकदम खास आहेत. या दोन नोटा एस.एस.शिराला नावाच्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून काढण्यात आल्या. जर्मनीच्या पाणबुडीने हे जहाज बुडवले होते. एसएस शिराला हे ब्रिटिश जहाज होते. त्यावेळी हे जहाज दारु, मुरब्बा आणि दारुगोळा घेऊन लंडनहून मुंबईकडे निघाले होते. 2 जुलै 1918 रोजी जर्मनी टॉरपिडोने केलेल्या हल्ल्यात ते आयरिश समुद्रकिनाऱ्याजवळ बुडाले. त्यातच या 10-10 रुपयांच्या दोन नोटा मिळाल्या होत्या. या दोन नोटा 25 मे 1918 रोजी जारी झाल्या होत्या. या नोटांवर गव्हर्नरची स्वाक्षरी नव्हती.
Two 10-rupee banknotes that were recovered from the wreck of the SS Shirala, which was sunk by a German U-boat on 2 July 1918.
See link to catalogue https://t.co/90hOK7qWUG#banknotes #indianrupee #shipwreck #uboat #WW1 pic.twitter.com/okeBd5oomw
— Noonans Mayfair (@NoonansAuctions) May 24, 2024
इतक्या महाग का विक्री झाल्या?
नूनन्स लिलावाशी संबंधित थॉम्सिना स्मिथ यांनी वृत्तसंस्था PTI शी बोलताना यासंबंधीची माहिती दिली. 10-10 रुपयांच्या इतक्या दुर्मिळ नोटा कधी पाहिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. 1918 मधील या घटनेविषयी बँक ऑफ इंग्लंड यांनी सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन्ही नोटा सुस्थिती असल्याचे स्मिथ यांनी सांगितले. या नोटांना बंडलमध्ये करकचून गुंडाळल्या होत्या. त्यामुळेच समुद्राच्या पाण्यात पण या नोटा शाबूत राहिल्या. हा कागद पण दर्जेदार असल्याने नोटा खाऱ्या पाण्यातही टिकला.