Indian Railway : रेल्वेचा विकासाचा ट्रॅक, 1200 इलेक्ट्रिक ट्रेन ताफ्यात! या कंपनीसोबत 26,000 कोटींचा करार
Indian Railway : रेल्वे विकासाच्या ट्रॅकवर सूसाट धावणार, गुंतवणूकदारांना असा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) कात टाकली आहे. संथगतीने धावणाऱ्या भारतीय रेल्वेने कधीचाच फास्ट ट्रॅक धरला. आता रेल्वे सुपर फास्ट धावणार आहे. कोळश्यावरुन भारतीय रेलेवे इलेक्ट्रिकवर धावत आहेत. ट्रेन आणि रेल्वे स्टेशनचा कायापालट होत आहे. विमानतळांना लाजवतील असे रेल्वे स्टेशन काही दिवसांत भारतात उभारण्यात येत आहे. या सर्व विकास प्रकल्पांना बळ देण्यासाठी रेल्वे खात्याने एक मोठा करार केला आहे. इलेक्ट्रिक इंजिनावर (Electric Engine) धावणाऱ्या रेल्वे तयार करण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारातून रेल्वेला, प्रवाशांना तर फायदा होईलच. पण या कंपनीचे गुंतवणूकदार (Investors) नक्कीच मालामाल होणार आहेत.
भारतीय रेल्वेने, इलेक्ट्रिक रेल्वेसाठी (Indian Railway Electric Train) सिमेन्स कंपनीसोबत करार केला आहे. सिमेन्स कंपनी रेल्वेसाठी 1200 इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन तयार करणार आहे. कंपनीने याविषयीची माहिती नुकतीच दिली. सोमवारी या कराराची माहिती देण्यात आली.
कंपनीने निवेदन सादर केले. त्यानुसार, रेल्वे मंत्रालयासोबत 9000 हॉर्स पॉवरचे 1200 इंजिन तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. कंपनीला भारतात मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. येत्या 11 वर्षांत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन तयार होतील.
सिमेन्स कंपनी, 1200 इलेक्ट्रिक इंजिन्स तयार करेल. करारानुसार पुढील 35 वर्षे दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी कंपनीकडे आहे. सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनिल माथूर यांनी सांगितले की, सिमेन्स मोबिलिटी तंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक इंजिनला गुजरात राज्यातील दाहोद येथील भारतीय रेल्वेच्या कारखान्यात असेंबल करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि सिमेन्स कंपनी दरम्यान त्यासाठी 26,000 कोटींचा करार करण्यात आला आहे. त्याचा फायदा सिमेन्सच्या गुंतवणूकदारांना होणार आहे.
यामध्ये कर आणि किंमतीतील तफावत यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या इंजिनांची देखभाल रेल्वेच्या विशाखापट्टनम, खडकपूर, रायपूर आणि पुणे येथील डेपोमध्ये करण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि देखभाल कंपनी रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत मिळून करणार आहे.
या आधुनिक रेल्वे इंजिनांचा उपयोग माल वाहतुकीसाठी करण्यात येईल. या रेल्वे 4500 टन वजन 120 किमी वेगाने घेऊन धावतील. हा प्रकल्प निसर्ग संवर्धनाचे काम ही करेल. यामुळे जवळपास 80 कोटी टनहून अधिक कॉर्बनड्राय ऑक्साईडची बचत होईल.