Sports Day Budget 2023 : खरंच, खेळाला आले सुगीचे दिवस? किती वाढले स्पोर्ट बजेट
Sports Day Budget 2023 : भारत सरकारने युवक आणि क्रीडा मंत्रालयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 3389.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी मोदी सरकारने खेलो इंडियासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. 2024 मधील पॅरिस ऑलम्पिक आणि पॅराऑलम्पिकमध्ये भारताची कामगिरी सुधारणे यावर केंद्र सरकारचा भर आहे.
नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : भारतात अनेक क्रीडा प्रकार आहेत. अनेक खेळ आहेत. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण क्रिकेटमय वातावरणात इतर खेळांना, वैयक्तिक खेळांना अद्यापही दुय्यम स्थान देण्यात येते. पण गेल्या काही वर्षांपासून हा पायंडा मोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारताचे नाव इतर क्रीडा प्रकारात सर्वात अग्रेसर असावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. ऑलम्पिक स्पर्धांमध्ये, राष्ट्रकूल, आशियायी स्पर्धात आता अनेक भारतीय खेळाडू नाव कमावत आहेत. केंद्र सरकारने क्रीडा प्रकारांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. चीनने सर्वात मागून येत आता अनेक क्रीडा प्रकारात अमेरिकेसह दिग्गज देशांना आव्हान दिले आहे. भारतात पण हाच प्रयोग राबविण्यात येत आहे. खेळाडूंना चांगले क्रीडांगण, सोयी-सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने स्पोर्ट बजेटमध्ये (Sports Day Budget 2023 ) भरीव तरतूद केली आहे. त्याचा फायदा भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल. जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश पदतालिकेत सुद्धा पहिल्या काही मोजक्या देशात चमकावा हे भारतीयांचे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल.
किती आहे क्रीडा अर्थसंकल्प
केंद्र सरकारने यावर्षी युवक आणि क्रीडा मंत्रालयासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यंदा क्रीडा प्रकारासाठी 3389.32 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांशी त्याची तुलना केली तर हा निधी जास्त असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी 2022-23 साठी युवक आणि क्रीडा मंत्रालयाला 2671.42 कोटी रुपये देण्यात आले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा केंद्र सरकारने खेलो इंडियाच्या बजेटमध्ये जवळपास 723.97 कोटी रुपयांची वाढ केली आहे. जम्मू काश्मिरमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 15 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.
पाच वर्षांत मोठी वाढ
यावर्षीच्या बजेटमध्ये गेल्या पाच वर्षांपेक्षा भरीव आर्थिक तरतूद केल्याचे दिसून येते. क्रीडा प्रकारात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यामागे भारतात खेळाला प्रोत्साहन देणे हे आहे. केंद्र सरकार 2024 मधील पॅरिस ऑलम्पिक आणि पॅराऑलम्पिकमध्ये भारताची कामगिरी उंचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या भरीव आर्थिक तरतुदीमुळे क्रीडा प्रकार आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाला प्रोत्साहन मिळेल. निधीच्या तरतुदीमुळे खेळाडूंना चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध होईल.
पाच वर्षांत असा वाढला निधी
- 2018-19 मध्ये केंद्र सरकारने क्रीडा प्रकारासाठी 2075.35 कोटी रुपयांचा निधी दिला
- 2019-20 मध्ये क्रीडा प्रकारासाठी 2301.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
- 2020-21 मध्ये 2400.00 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली होती.
- 2022-23 मध्ये क्रीडा विभागासाठी सढळ हाताने केंद्र सरकारने 3389.32 कोटींचा निधी दिला.
- यंदा क्रीडा प्रकारासाठी 3389.32 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.
क्रीडा दिवस का करतात साजरा
29 ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंती निमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. येत्या काही वर्षांत भरीव तरतूद होत गेली आणि क्रीडा प्रकारासाठी विशेष सोयी-सुविधा, फ्री कोचिंग, मोठमोठ्या क्रीडा विद्यापीठ स्थापण केल्या गेली तर चित्र पालटेल.