Share Market : G 20 पूर्वीच फुलला शेअर बाजार, गुंतवणूकदारांनी अशा छापल्या नोटा
Share Market : गेल्या 6 दिवसांत शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय निर्देशांक 333 अंकांच्या तेजीसह बंद झाला. बीएसई इंडेक्स अजूनही त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 1000 अंकांनी पिछाडीवर आहे.
नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : जागतिक बाजार सध्या ताकही फुंकून पीत आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) सलग 6 व्या दिवशी तेजीत आहे. या 6 दिवसांत शेअर बाजारात 3 टक्के तेजी दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करता आली. भारतीय अर्थव्यवस्था सध्या जोमाने आगेकूच करत आहे. या घोडदौडची नोंद जागतिक संस्थांसह जागतिक बँकेने पण घेतली आहे. जगातील दिग्गज अर्थव्यवस्था मंदीने मंद झाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सूसाट आहे. त्याचा अनुकूल परिणाम भारतीय कंपन्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजार वधारला आहे. शेअर बाजारात (Share Market) गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, 8 सप्टेंबर रोजी भारतीय निर्देशांक 333 अंकांच्या तेजीसह बंद झाला. अजूनही बीएसई इंडेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 1000 अंकांनी पिछाडीवर आहे.
आज शेअर बाजारात तेजी
बीएसई निर्देशांक, सेन्सेक्स 66,265.56 या जुन्या बंदवरुन 66,381.43 अंकावर उघडला. त्यात आज 501 अंकाची वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्स 66,766.92 च्या इंट्राडे हायवर पोहचला. सेन्सेक्स 333 अंकांनी वधारला. निर्देशांक 66,598.91 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 93 अंकांनी वाढला. तो 19,819.95 अंकावर बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्सने 32,692.74 हा नवीन रेकॉर्ड केला. हा इंडेक्स 32,672 अंकावर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स या सत्रात 38,369.21 या नवीन उच्चांकावर पोहचला. त्यात 0.43 टक्क्यांची वाढ झाली. हा निर्देशांक 38,266.53 वर बंद झाला. गेल्या सहा सत्रात सेन्सेक्स 2.73 टक्के तर निफ्टी 2.94 टक्क्यांनी वधारला.
निफ्टी गाठेल 20 हजारांचा टप्पा
देशातील गुंतवणूकदारांच्या नजारा नवी दिल्लीतील जी 20 च्या संमेलनाकडे लागल्या आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार सातत्याने खरेदी वाढवत आहेत. हे भारतीय शेअर बाजारासाठी चांगले संकेत आहेत. सध्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी पिछाडीवर आहे. पुढील आठवड्यात निफ्टी 20 हजारांचा टप्पा गाठेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
मार्केट कॅपमध्ये 11 लाख कोटींचा फायदा
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 31 ऑगस्ट रोजी 309.6 लाख कोटी रुपये होते. ते आज वाढून 320.9 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. म्हणजे केवळ सहा दिवसांत गुंतवणूकदारांनी 11.3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम कमावली. गुंतवणूकदारांना जवळपास 1.8 लाख कोटींचा फायदा झाला. मागील सत्रात बीएसई-लिस्टिड कंपन्यांचे मार्केट कॅप 319.1 लाख कोटी रुपये होते. या महिन्यातच शेअर बाजाराची घौडदौड दिसून येईल. गुंतवणूकदारांना किती फायदा होतो, हे समोर येईल.