Share विकल्या विकल्या, पैसा खात्यात जमा; T+0 ची होणार सुरु सेवा
Share Market Settlement | भारतीय शेअर बाजार अधिकाधिक पारदर्शक होत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. पूर्वी शेअर विक्री केल्यावर तीन ते चार दिवसांनी खात्यात रक्कम येत होती. आता एका दिवसांत ही रक्कम येते. आता त्यापुढील पाऊल टाकण्यात येत आहे.
नवी दिल्ली | 12 March 2024 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक करण्यासाठी, झटपट पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. पूर्वी शेअर विक्री केला. ट्रेड पूर्ण झाला तर खात्यात रक्कम जमा होण्यासाठी तीन ते चार दिवस लागत. त्यानंतर दोन दिवस आणि आता एका दिवसात रक्कम खात्यात येते. आता त्यापुढे पाऊल टाकण्यात येत आहे. शेअर विकला की लागलीच तुमच्या खात्यात रक्कम (T+0 Settlement) जमा होणार आहे. बाजार नियंत्रक SEBI ने मार्च महिन्यापासून T+0 ही व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या T+1 व्यवस्था
सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल. ही व्यवस्था मार्च 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या देशात भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यानंतर भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश असेल. येत्या 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये खात्यात झटपट पैसा जमा होईल.
गुंतवणूकदारांकडे दोन पर्याय
- मार्केट नियंत्रक सेबीने याविषयीची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार, T+0 लागू केल्यास सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.
- दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
- सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.