मायावतींना दणका, पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करण्याचे आदेश
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वीच बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या अध्यक्ष मायावतींना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. नोएडामधील हत्तींच्या पुतळ्यांसाठी जो पैसा खर्च करण्यात आला, तो पैसा सरकारच्या तीजोरीत जमा करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मायावती यांच्या वकिलांना दिले. मायावतींनी सर्व पैसे आपल्या खिशातून सरकारी तिजोरीत जमा करावे, असं कोर्टाने बजावलं. यानंतर […]
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वीच बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या अध्यक्ष मायावतींना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. नोएडामधील हत्तींच्या पुतळ्यांसाठी जो पैसा खर्च करण्यात आला, तो पैसा सरकारच्या तीजोरीत जमा करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मायावती यांच्या वकिलांना दिले. मायावतींनी सर्व पैसे आपल्या खिशातून सरकारी तिजोरीत जमा करावे, असं कोर्टाने बजावलं. यानंतर मायावतींच्यावतीने पुढील सुनावणी मे महिन्यात घेण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने फटकारत पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल असं सांगितले.
मायावती यांनी नोएडामध्ये बसवलेले हत्ती हे बसपाचे निवडणूक चिन्ह आहे. उत्तर प्रदेशात मायावतींचं सरकार सत्तेत असताना, तत्कालिन मुख्यमंत्री मायावती यांनी नोएडासह उत्तर प्रदेशात हत्तींचे पुतळे उभे केले होते. मात्र त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. नोएडात बसवण्यात आलेल्या हत्तींच्या पुतळ्यांचा खर्च बसपाकडून वसूल केला जावा, अशी मागणी याचिकाकर्ते रवीकांत यांनी केली आहे. मायावती आणि बसपाचे निवडणूक चिन्ह असलेले पुतळे तयार करण्यासाठी सरकारी पैसा वापरला होता. त्यामुळे पुतळ्यांसाठी वापरण्यात आलेला हा पैसा सरकारी तीजोरीत पुन्हा जमा करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
सरकारी पैसा कुठेही खर्च करता येऊ नये. याबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेले सरकारी पैसे पुन्हा वसूल करावे, अशी मागणी रवीकांत यांनी 2009 मध्ये जनहित याचिकेद्वारे केली होती.
2007 ते 2012 दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये बसपाची सत्ता होती. यावेळी लखनऊ आणि नोएडामध्ये मायवती सरकारने अनेक पुतळे उभे केले. यातील काही स्मारकांच्या खर्चावरुन ईडीकडून चौकशीही सुरु होती.
मायवतींनी जनतेचा पैसा वापरुन तयार केलेल्या स्मारकांवर विरोधकांनीही टीका केली होती. आता सुप्रीम कोर्टानेही यावर निशाणा साधत, यासाठी झालेला सर्व खर्च सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 2 एप्रिलला होणार असून न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
6000 कोटींचा खर्च
उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकरदरम्यान लखनऊ विकास प्रधिकरणाचा अहवाल समोर आला होता. ज्यामध्ये दावा केला होता की, लखनऊ, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात आलेल्या पार्कवर एकूण 5,919 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
नोएडामध्ये दलित प्रेरणा स्थळी बसपाने स्वत:चं निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे 30 दगडी पुतळे, तर 22 कांस्य पुतळे उभारले होते. यासाठी एकूण 685 कोटी रुपये खर्च आला होता. इतकंच नाही तर या पार्क आणि पुतळ्यांच्या देखभालीसाठी 5,634 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
2012च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तेव्हा अखिलेश यांनी मायवतींवर 40 हजार कोटी रुपयांचा पुतळा घोटाल्याचा आरोप केला होता.