Swiggy : स्विगीकडून ‘या’ पाच शहरात सुपर डेली सेवा बंद, कंपनी तोट्यात असल्याने निर्णय!
फुड डिलिव्हरीतील मातब्बर कंपनी स्विगीने दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह पाच शहरांमध्ये 'सुपर डेली' सेवा बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन फुड डिलिव्हरीतील (Online Food delivery) मातब्बर कंपनी स्विगीने (Swiggy) दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह पाच शहरांमध्ये ‘सुपर डेली’ (Super Daily) सेवा बंद केली आहे. सुपर डेली सेवा बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद अशा मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये ही सेवा मिळणार नाही. 10 मे रोजी कंपनीने हा निर्णय घेतला होता. ज्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक आहेत, ते परत केले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. 5-7 व्यावसायीक दिवसांमध्ये रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत, कंपनी दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामान वितरीत करते. ही सेवा सबस्क्रिप्शनवर आधारित आहे, म्हणजेच ग्राहकांना या सेवेसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. ही सेवा बंद होण्यामागे स्विगीचा तोटा हे कारण असल्याची चर्चा आहे. या आव्हानात्मक काळात खर्च आणि तोटा कमी ठेवण्यावर कंपनी भर देत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीला तोटा झाल्याने ही सुविधा बंद करण्यात आली आहे.
या शहरांमध्ये सेवा बंद
स्विगीची सुपर डेली सेवा बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद अशा मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांना ही सेवा मिळणार नाही. 10 मे रोजी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बेंगळुरूतील कंपनीची ही सबस्क्रिप्शन बेस्ड सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. स्विगीचे सहसंस्थापक आणि सुपर डेलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फनी किशन एडेपली यांनी सांगितले आहे की, व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सेवा बंद करण्याची सविस्तर योजना आखण्यात आली आहे. तर बेंगळुरूमध्ये ही सेवा वाढवण्यासाठी दुहेरी प्रयत्न केले जाणार आहेत.
उद्दिष्ट साध्य करण्यावर भर
फनी किशन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात मेल पाठवला आहे. मेलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही आता ग्राहकांच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनलो आहोत. पण आपण अद्याप नफ्याच्या वाटा चोखंदळू शकलो नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे ज्या सेवेसाठी कंपनी वेळ आणि पैसा गुंतवत आहे, त्यातून फलनिष्पत्ती मिळत नसेल तर अशा सेवा बंद करणे आवश्यक आहे, अशी भावनिक आणि व्यावसायिक साद त्यांनी कर्मचाऱ्यांना घातली आहे. बाजारपेठेनुसार स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीनं स्वत:ला संघटित करणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आयआयटी मुंबईचे पदवीधर श्रेयस नागदावणे आणि पुनीत कुमार यांनी 2015 मध्ये सुपर डेलीची सुरुवात केली होती. हे सप्टेंबर 2018 मध्ये स्विगीने ही सेवा विकत घेतली होती.