Tata Tech IPO : टाटा कंपनीच्या आयपीओवर कोण होणार मालामाल, 19 वर्षांनी इतिहास घडणार

| Updated on: Jul 14, 2023 | 10:09 AM

Tata Tech IPO : टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. 19 वर्षांनी टाटा आयपीओ बाजारात उतरत आहे. त्यामुळे बाजारात वातावरण तापले आहे. शेअर खरेदीच्या चर्चांचा ऊत आला आहे.

Tata Tech IPO : टाटा कंपनीच्या आयपीओवर कोण होणार मालामाल, 19 वर्षांनी इतिहास घडणार
Follow us on

नवी दिल्ली : टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) लवकरच आयपीओ बाजारात उतरविणार आहे. 19 वर्षानंतर टाटा समूहातील एखाद्या कंपनीचा आयपीओ पदार्पण करणार आहे. त्यामुळे बाजारात वातावरण तापले आहे. आयपीओसाठी आतापासूनच अनेकांनी कंबर कसली आहे. काहीजण पैशांची जमवाजमव करत आहेत. तर काहींनी किती शेअर खरेदी करता येईल याचे प्लॅनिंग सुरु केले आहे. अजून याविषयीची माहिती समोर यायची असली तरी ग्रे मार्केटमध्ये मात्र या शेअरने मुसंडी मारली आहे. यापूर्वी टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ (TCS IPO) जुलै, 2004 मध्ये आला होता. गुंतवणूकदारांमध्ये टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ दाखल होत असल्याचा उत्साह आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लवकरच बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो.

जीएमपी किती?
आयपीओ वॉचने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ 100 रुपये प्रति शेअर जीएमपीवर ग्रे मार्केटमध्ये सुरु आहे. अनलिस्टेड सिक्युरिटीजविषयीच्या माहितीगारानुसार, 750 रुपयांच्या स्तरावर खरेदीदार समोर येत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजने या वर्षी मार्च महिन्यात सेबीकडे आयपीओ संबंधित सर्व दस्तावैज दाखल केले आहेत. हा इश्यू ऑफर फॉर सेल(OFS) या अंतर्गत येईल. म्हणजे कंपनी कोणताही शेअर जारी करणार नाही. कंपनीचे सध्याचे शेअरधारकच त्यांच्या शेअर्सची विक्री करतील.

इतके शेअर बाजारात
ऑफर फोर सेल अंतर्गत कंपनीचे शेअरधारक 9.57 कोटी युनिट्सची विक्री करतील. कंपनीच्या पेडअप स्टॉक कॅपिटलचा हा 23.60 टक्के हिस्सा असेल. टाटा मोटर्सच्या आयपीओद्वारे 81,133,706 शेअर विक्रीचा प्रस्ताव आहे. यामध्ये अल्फा टीसी होल्डिंग्स पीटीईने 97.16 लाख शेअर (2.40%) आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.58 लाख इक्विटी शेअर (1.20%) विक्री करण्याची योजना आहे.

हे सुद्धा वाचा

कधी येईल आयपीओ
टाटा टेक्नॉलॉजीजचा आईपीओ पुढील 5-6 महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. काही वृत्तानुसार, आयपीओ किती मोठा असेल, तसेच इतर अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मार्च महिन्यात कंपनीने दाखल केलेल्या प्रस्तावाला सेबीने मंजुरी दिली आहे.

कंपनी होईल कर्जमुक्त
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.