ही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा
दोन्ही मॉडेलची किंमत अनुक्रमे 9.99 लाख रुपये आणि 10.9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील शो रुममधील ही किंमत असून यामध्ये टीसीएस आणि FAME इन्सेंटिवचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेली Tata Tigor EV अखेर भारतात लाँच झाली असून या कारचे XM आणि XT हे दोन मॉडेल आहेत. दोन्ही मॉडेलची किंमत अनुक्रमे 9.99 लाख रुपये आणि 10.9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील शो रुममधील ही किंमत असून यामध्ये टीसीएस आणि FAME इन्सेंटिवचाही समावेश आहे.
Tigor EV सध्या फक्त फ्लीट ऑपरेटर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय FAME अनुदान सार्वजनिक वाहतूक करणारे वाहनं आणि व्यवसायिक वाहतुकीसाठी नोंदणी करणाऱ्या गाडीसाठीच मिळेल. कार्बन एमिशन कमी करुन सार्वजनिक वाहतुकीसाठी खाजगी वाहनांच्या वापर करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं आहे. Tigor EV ला FAME इंडिया स्कीम फेज – 2 अंतर्गत 1.62 लाख रुपयांचं सरकारी अनुदान मिळणार आहे.
टाटा कंपनीचं हे पहिलंच ऑल इलेक्ट्रीक वाहन आहे. Tigor EV Xm आणि XT तीन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये तीन एक्सटीरियर कलर्स- व्हाईट, सिल्वर आणि ब्लू यांचा समावेश आहे. आणखी काही फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. समोर ड्युअल एअरबॅग्स, ABS, रियर पार्किंग सेंसर, ओव्हर स्पीडिंग अलार्म आणि 1 जुलैपासून अनिवार्य होणाऱ्या सेफटी फीचर्सचाही समावेश आहे.
Tigor EV ला 16.2kWh चा बॅटरी पॅक देण्यात आलाय. जो 72V, 3-फेज AC इंडक्शन मोटरच्या माध्यमातून 41hp पॉवर आणि 105Nm टॉर्क जनरेट करेल. Tigor EV ला स्टँडर्ड वॉल सॉकेटने 6 तासात 80 टक्के चार्ज केलं जाऊ शकतं. DC 15kW फास्ट चार्जरने गाडी कमीत कमी 90 मिनिटात चार्ज केली जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
कार एकदा चार्ज केल्यास 142 किमी चालवली जाऊ शकते, असं कंपनीने म्हटलंय. कंपनीकडून या इलेक्ट्रीक कारसोबत बॅटरी पॅकसह तीन वर्षांसाठी 1.25 लाख किमीची वॉरंटी दिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. सरकारकडूनही यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. कारण, प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनं ही काळाची गरज बनली आहेत.