Loan : कर्जदारांची लवकरच बल्ले बल्ले, गृहकर्जासह वाहन कर्जाच्या व्याजदरात कपातीचे संकेत
Loan : महागाईने होरपळणाऱ्या कर्जदारांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : यंदा गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जाचे (vehicle Loan) वाढलेले हप्ते (EMI) कमी होऊ शकतात. बँका व्याजदरात कपात करु शकतात. त्यामुळे ग्राहकांची बल्ले बल्ले होणार आहे. यामागे अर्थातच कोणतेही रॉकेट सायन्स नाही. तर मंदीची भीती आहे. मंदीच्या (Recession) भीतीने हा बदल होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे. जागतिक मंदीच्या भीतीने जगभरातील केंद्रीय बँका (Central Bank) व्याजदर घटवण्याची शक्यता आहे. भारतीय बँकाही हाच ट्रेंड कायम ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार, धोरण तयार करणाऱ्यांना अर्थव्यवस्था आणि आर्थिक बाजाराचे नुकसान न करता महागाई नियत्रंणात ठेवायची आहे. तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड भारतात ही राहणार आहे. त्यामुळे भारतीय केंद्रीय बँक आणि इतर बँका व्याज दरात कपात करु शकतात.
जर व्याजदरात कपात झाली तर अर्थात त्याचा फायदा ग्राहकांना होईल. गेल्या वर्षी ग्राहकांना व्याजदर वाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांचा ईएमआय वाढल्याने घरचे बजेट कोलमडले आहे. त्यांच्या खिशावर बोजा पडला आहे.
2008 मध्ये पण जागतिक आर्थिक संकट असतानाही सर्वच केंद्रीय बँकांनी व्याजदरात कपात केली होती. परंतु, संबंधित केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगळे धोरण राबविले होते. यावेळची परिस्थिती भिन्न आहे.
यावेळी शेअर बाजारा अस्थिर असला तरी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. बाजार हिंदोळ्यावर असतानाही गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला. भारतीय शेअर बाजारात हात पोळले असले तरी काही शेअर्सनी कमाईची संधी दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात अनेकदा वाढ केली. आरबीआयने रेपो दर वाढविल्याने तो 6.25% झाला होता. त्यामुळे अनेक बँकांनी गेल्यावर्षी व्याज दर वाढवले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर ईएमआयचा बोजा वाढला होता.