Bank ATM : ‘एटीएम’चं अस्तित्वच धोक्यात ! नागरिकांनी पाठ फिरविण्याचे कारण तरी काय
Bank ATM : देशातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अचानक रोडावल्याचे दिसून आले आहे. यामागची कारणं तरी काय..
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी देशातील एटीएमच्या (ATM) बाहेर लांबच लांब रांगा लागत होत्या. एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी एकच गर्दी उसळत असे. त्यात शहराच्या, तालुक्याच्या एटीएमवर तर अधिक गर्दी असायची. त्याचवेळी, 2016 मध्ये केंद्र सरकारने BHIM App च्या रुपाने UPI सारखं डिजिटल पेमेंटचं हत्यार लोकांच्या हाती दिले. आता 8 वर्षानंतर युपीआयच्या व्यापक वापरामुळे एटीएमचं अस्तित्वतच धोक्यात आले आहे. आता एटीएमवर पूर्वीसारखी गर्दी होत नाही. काही ठिकाणीच नागरिक रोखीतून व्यवहार करत आहेत. अर्थात हे प्रमाण लक्षणिय घटलं असलं तरी रोखीतील व्यवहार पूर्णपणे बंद झाले असे नाही.
8 नोव्हेंबर 2016 मध्ये भारतात नोटबंदी झाली. भारतात डिजिटल पेमेंटला बिग बुस्ट मिळाला. याविषयी भारतीय स्टेट बँकेने एक संशोधन अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये एटीएममध्ये जाणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या आठ वर्षांत खूप घसरल्याचा दावा करण्यात आला. रोखीचा व्यवहार कमी झाला नसला तरी एटीएमवर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
इतका बसला फटका एसबीआयच्या इकोनॉमिक रिसर्च रिपोर्ट, ‘SBI Ecowrap’ च्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2016 मध्ये एक भारतीय नागरिक वर्षांतून किमान 16 वेळा एटीएमवर जात होता. तर एप्रिल 2023 मध्ये हा आकडा अर्ध्यावर आला आहे. आता वर्षांतून एक नागरिक केवळ 8 वेळा एटीएम मशीनवर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालात याचे सर्व श्रेय युपीआय पेमेंटला देण्यात आले आहे. युपीआय पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही तफावत दिसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
UPI व्यवहारात मोठी वाढ देशात आर्थिक वर्ष 2016-17 ते 2022-23 या दरम्यान युपीआय व्यवहाराची एक लाटच आली आहे. त्यावेळी युपीआय व्यवहारांची संख्या केवळ 1.8 कोटी रुपये होती. आता हा आकडा 8,375 कोटींवर पोहचला आहे. देशात एकूण होणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये 73 टक्के भाग एकट्या युपीआयचा आहे. सुरुवातीच्या काळात युपीआयच्या माध्यमातून केवळ 6,947 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. तर सध्या हा आकडा 139 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. युपीआय व्यवहारांमध्ये 2004 पटींनी वाढ झाली आहे.
व्यवहाराची मर्यादा किती NPCI नुसार दररोज 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. परंतु, बिल पेमेंट आणि व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. तर बँकिंग व्यवहार करताना, रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी मर्यादा आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 25,000 ते 1 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करता येते. काही बँकांनी दैनंदिन ऐवजी आठवड्याची आणि महिन्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार, एचडीएफसी महिन्याकाठी 30 लाख रुपये हस्तांतरणाची परवानगी देते.