नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : शेअर बाजाराने नवीन टप्पा गाठला आहे. नवनवीन उच्चांक गाठत असतानाच बाजाराला झटका बसला. बुधवारी बाजारात मोठी पडझड झाली. गुरुवारी बाजार निदान सपोर्ट लेव्हल गाठेल असे वाटत होते. बाजार गुंतवणूकदारांना दिलासा देईल असा अंदाज होता. पण गुरुवारी हा अंदाज खोटा ठरला. बुधवारी मुंबई स्टॉक एक्सचेंज हा 30 शेअरचा निर्देशांक 1628 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्यावेळी तो 71,000 पेक्षा कमी होता. तर गुरुवारी बाजार उघडताच तो 600 अंकापेक्षा अधिक घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 150 अंकानी माघारी आला. पडझडीच्या सत्रामुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. तर गुंतवणूकदारांनी या घसरणीत कमाईची संधी हेरली.
बाजार उघडताच दणआपट
जागतिक बाजाराच्या प्रभावामुळे Sensex-Nifty गुरुवारी आपटले. सेन्सेक्स 523.06 अंकानी वा 0.73 टक्क्यांनी घसरला. तो 70,977.70 अंकावर उघडला. तर निफ्टीने बाजार उघडताच 153.70 अंक वा 0.71 टक्क्यांनी घसरुन 21,418.30 अंकावर ओपन झाला. त्यानंतर त्यात मोठी पडझड झाली. दुपारि 2 वाजता सेन्सेक्स 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह 71,138.14 अंकावर होता. तर Nifty 0.57 टक्के घसरणीसह 21,448.20 अंकावर होता.
HDFC Bank ने पुन्हा दिला दणका
गुरुवारी HDFC Bank च्या शेअरने पुन्हा दणका दिला. 10 मिनिटांच्या व्यापारात हा शेअर दोन टक्क्यांनी घसरला. सकाळच्या सत्रात हा शेअर 1502.95 रुपयांवर ट्रेड करत होता. बुधवारी हा शेअर 8 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. एचडीएफसीच्या बाजारातील भांडवलात एक लाख कोटींपेक्षा अधिकची घसरण आली. याशिवाय L&T Mindtree, Power Grid Corp, Asian Paint, SBI Life Insurance या शेअरने पण निराशा केली.
Reliance ची दमदार कामगिरी
शेअर बाजाराचे व्यापारी सत्र सुरु होताच जवळपास 1375 शेअरने चांगली सुरुवात केली. तर 876 शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. निफ्टीमध्ये अदानी पोर्टस, अपोलो हॉस्पिटल्स, अल्ट्राटेक सिमेट, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर तेजीसह व्यापार करत होते.
MRF चा महागडा शेअर
शेअर बाजारात गेल्या 3 दिवसांत घसरणीचे सत्र सुरु आहे. तरीही टायर तयार करणाऱ्या एमआरएफ कंपनीच्या शेअरने या वर्षात नवीन रेकॉर्ड केला. बाजारातील सर्वात महागडा स्टॉक MRF ने पुन्हा एक नवीन विक्रम नावावर नोंदवला. या शेअरची किंमत आता दीड लाख रुपये झाली आहे. गुरुवारी बाजारात या स्टॉकमध्ये किंचित घसरण दिसून आली. MRF चा शेअर काही वर्षांपूर्वी 11 रुपयांवर होता. आता तो 1,34,808.70 रुपयांवर आहे.