Sundar Pichai : श्रीमंतीत तर बॉसला पण टाकले मागे, IIT ड्रॉपआऊट कर्मचाऱ्याने असे गाडले झेंडे
Sundar Pichai : या कर्मचाऱ्याने श्रीमंतीत त्याच्या बॉसला पण मागे टाकले. IIT ड्रॉपआऊट कर्मचाऱ्याच्या मिळकतीचे आकडे बॉसपेक्षा इतके आहे जास्त...
नवी दिल्ली : गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. जगातील प्रमुख संस्थांमध्ये भारतीयांचा वाढता दबदबा, ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. सुंदर पिचाई यांच्यामुळे अनेकांच्या स्वप्नांना पुन्हा पंख मिळाले. पिचाईंच्या यशामागचा संघर्ष सर्वांनी वाचला आहे. त्यामुळे मध्यमवर्गातील, दूर खेड्यातील अनेक तरुणांना काही तरी करुन दाखविण्याचे आत्मबळ मिळाले. पण गुगलमधील अजून एका भारतीयाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. ते संपत्तीच्या, श्रीमंतीच्या बाबतीत बॉस पिचाई यांच्यापेक्षा काकणभर पुढे आहेत. IIT ड्रॉपआऊट कर्मचाऱ्याच्या मिळकतीचे आकडे बॉसपेक्षा इतके जादा आहेत..
कोण आहेत थॉमस कुरियन गुगल क्लाउडविषयी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. थॉमस कुरियन (Thomas Kurian) हे गुगल क्लाउडचे सीईओ आहेत. ते आयआयटी ड्रॉपआऊट असले तरी त्यांनी यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. गुगलचे बॉस सुंदर पिचाई यांच्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे. 2018 पासून ते गुगल क्लाउडची कमान संभाळत आहेत.
केरळमधून प्रवास थॉमस कुरियन हे नेटॲपचे सीईओ जॉर्ज कुरियन यांचे जुळे भाऊ आहेत. दोन्ही भाऊ श्रीमंतीच्या बाबतीत पुढे आहेत. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. थॉमस यांचे सुरुवातीचे शिक्षण बेंगळुरुमधील सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतले. पण त्यांनी शिक्षण पूर्ण केले नाही. त्यांनी मधातूनच शिक्षण सोडले. ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत प्रिंसटन विद्यापीठातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
पहिली नोकरी कोणती तेव्हापासून ते अमेरिकेतच आहेत. शिक्षण पूर्ण होताच, त्यांना तिथेच नोकरी मिळाली. मॅकिन्से अँड कंपनीमध्ये त्यांना पहिल्यांदा नोकरी मिळाली. 6 वर्षांपर्यंत त्यांनी या कंपनीत काम केले. त्यानंतर कुरियन 1996 मध्ये ओरेकलमध्ये रुजू झाले. ते टीम लिडर होते. त्यांनी या कंपनीत 22 वर्षे काम केले. 32 देशांमध्ये 35 हजार लोकांची टीम त्यांनी सांभाळली. 2018 मध्ये त्यांनी गुगल क्लाउड जॉईन केले.
किती आहे एकूण संपत्ती हुरुन इंडिया श्रीमंतांची यादी 2022 नुसार, थॉमस कुरियन यांच्याकडे 12,100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती 5300 कोटी रुपये आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची एकूण संपत्ती 6200 कोटी रुपये आहे. थॉमस यांची एकूण संपत्ती सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. गुगलचे सीईओ पदी सुंदर पिचाई आहे तर क्लाईडचा पदभार कुरियन यांच्याकडे आहे. पद श्रेणीत ते कनिष्ठ असले तरी दौलतीचे आकडे सर्वाधिक आहे. मुळातच कुरियन यांचे कुटुंबिय गर्भश्रीमंत आहे. त्यांचे वडिल खानदानी श्रीमंत होते.