Today petrol, diesel rates: इंधनाचे नवे दर जारी; पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची शक्यता, जाणून घ्या आजचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा (Petrol) दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol price in Mumbai) प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर106.03 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. दुसरीकडे आज कच्च्या तेलाचे दर देखील स्थिर असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 119.7 डॉलर प्रति बॅरल एवढे आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या दरानुसार आज राज्यात देखील पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे 111.35 आणि 97.28 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98 रुपये इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 111.02 रुपये असून डिझेलचा भाव 95.54 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये एवढा आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 95.73 रुपये एवढा आहे. नागपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 111.41 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 95.92 रुपये मोजावे लागत आहेत.
…तर पेट्रोल, डिझेल महागणार
दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. मात्र त्यात मोठ्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रशिया, युक्रेन युद्ध सुरू होण्याआधी कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 95 डॉलरच्या आसपास होते. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर 119.7 डॉलर प्रति बॅरल एवढे आहेत. चार दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा भाव 124 डॉलरवर पोहोचला होता. अमेरिकेने रशियावर घातलेल्या निर्बंधानंतर कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान युद्ध सुरूच राहिले तर कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यास भारतात पेट्रोल, डिझेल महाग होण्याचा अंदाज आहे.