Start up : कोरोना काळात नोकरी गमावली, मित्रासह सुरू केला ‘मांस’ विक्रीचा उद्योग, 2 वर्षांत कमावले 10 कोटी
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक लोकांची नोकरी गेली, ते बेरोजगार झाले. औरंगाबादमधील दोन मित्रांनाही त्यांची नोकरी गमवावी लागली. मात्र त्यांनी हार न मानता अवघ्या 25 हजार रुपयांत मांस विक्री उद्योग सुरू केला.
औरंगाबाद : ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे..’ मैत्रीचं मिसाल बनलेले हे गाणं पक्क्या दोस्तांच अतिशय आवडतं. अशीच घनिष्ठ मैत्री आहे औरंगाबादमधल्या (Aurangabad) आकाश म्हस्के आणि आदित्य कीर्तने या दोघांची. कोरोनाने जगभरात कहर माजवला, लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आकाश आणि आदित्य या दोघांनाही कोरोनामुळे नोकरी (Lost Jobs) गमवावी लागली. करीअर संकटात सापडले. मात्र अचानक आलेल्या समस्येमुळे खचून न जाता, या दोन मित्रांनी एकमेकांच्या साथीने ‘मांसविक्रीचा’ नवा उद्योग सुरू केला. दोन वर्षांपूर्वी चाचपडत सुरू केलेल्या या उद्योगाने आता भक्कमपणे पाय रोवले असून, दर महिन्याला त्यांचा 4 लाखांहून अधिक रुपयांचा व्यवसाय होतो.
असा सुरू झाला व्यवसाय
आकाश आणि आदित्य एका कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करत होत. मात्र कोरोना काळात देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामध्ये या दोघांना नोकरी गमवावी लागली. लॉकडाऊनचा पहिला महिना निश्चिंतपणे काढणाऱ्या या दोघांवर नोकरी गमावल्याने मोठे संकट कोसळले. मात्र खचून न जाता त्यांनी एकमेकांच्या साथीने घट्ट पाय रोवून उभं राहण्याचा निर्णय घेतला. इतर कंपन्यांमध्ये नोकरी शोधत फिरण्यापेक्षा आकाश आणि आदित्यने स्वत:चाच ‘स्टार्ट अप’ सुरू करण्याचे ठरवले आणि त्यातूनच उभी राहिली ‘ॲपेटाइटी’ (Appetitee) ही कंपनी. या कंपनीद्वारे आकाश व आदित्यने मांसयुक्त उत्पादनांची विक्री व होम डिलीव्हरी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी तेथील एका स्थानिक युनिव्हर्सिटीमधून मांस आणि पोल्ट्री प्रोसेसिंग संदर्भात ट्रेनिंगही घेतले. त्यानंतर व्यवस्थित सर्व्हे करुन त्यांनी मांसविक्रीच्या व्यवसायात उडी मारण्याचे ठरवले. दोघांच्या कुटुंबियांकडून सुरुवातील या व्यवसायासाठी पाठिंबा मिळाला नाही. ‘आम्ही ज्या ( मांसविक्रीच्या) व्यवसायात आहोत, त्याकडे पाहून आमचं लग्न कसं होईल? आम्हाला (लग्नासाठी)मुलगी कोण देईल?’ अशी चिंता आमच्या घरच्यांना होती. मात्र आम्हा दोघांची मेहनत पाहून थोड्याच दिवसात तेही आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असे आदित्यने सांगितले.
केवळ 25 हजार रुपयात सुरू केला व्यवसाय
आदित्य आणि आकाश या दोघांनी या क्षेत्राचा अभ्यास करून, त्या संदर्भात ट्रेनिंग घेतल्यानंतर 100 चौरस फुटाच्या जागेत अवघ्या 25 हजार रुपयांसह ‘ॲपेटाइटी’ कंपनी सुरू केली. हळूहळू त्यांचा या क्षेत्रात जम बसू लागला. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मांसयुक्त पदार्थांची विक्री तसेच होम डिलीव्हरीही सुरू केली. चिकन, मांस अशा पदार्थांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. सध्या या कंपनीचा दर महिन्याला 4 लाखांहून अधिक रुपयांचा व्यवसाय होतो.कंपनीचा हळूहळू विस्तार होत असतानाच औरंगाबादमधील फॅबी कॉर्पोरेशन या कंपनीने त्यांच्यात रस दाखवला. फॅबी कंपनीने नुकताच ‘ॲपेटाइटी’ कंपनीतील मेजॉरिटी शेअर्स 10 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. असे असले तरी आदित्य व आकाश अजूनही कंपनीशी जोडलेले आहेत. फॅबी कंपनीचे अध्यक्ष फहाद सैय्यद यांच्या सांगण्यानुसार, ‘ॲपेटाइट’ हा ब्रँड कायम राहणार असून त्याच नावाखाली नवनवीन उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येतील.