नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : चीनच्या धूर्त चालीमुळे जगात भारताविषयी कलुषीत वातावरणाचा पहिला ट्रेलर कॅनडाच्या (India-Canada Tension) रुपाने समोर आला. भारताने कॅनडाच्या नांग्या ठेचल्याने जगभरात जबरदस्त संदेश गेला. पण भारताच्या शेजारील काही देश अजूनही चीनच्या ओंजळीने पाणी पितात, हे उघड झाले आहे. श्रीलंकेने त्यात स्वतःचे दिवाळे काढून घेतले. पाकिस्तान त्याच मार्गाने जात आहे. आता आणखी एका शेजाऱ्याने भारताविषयीची आकस बुद्धी समोर आणली आहे. या देशाने भारतीयांचे त्यांच्या देशात स्वागत असल्याचे म्हणत, हळूच एक नियम समोर केला आहे. 100 रुपयांपेक्षा अधिकच्या भारतीय नोटा आणू नका, असा फतवाच या देशाच्या राष्ट्रीय बँकेने काढला आहे.
नेपाळ राष्ट्र बँकेचा फतवा
नेपाळ हा सामाजिक, धार्मिकदृष्ट्या भारताचा अत्यंत शेजारील देश आहे. पण तोही चीनकडे झुकलेला आहे. तुम्ही धार्मिक यात्रेवर अथवा पर्यटनासाठी नेपाळमध्ये जात असाल तर आता तुम्हाला भारतीय नोटा नेताना काळजी घ्यावी लागणार आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक भारतीय नोटा आणूच नका, असा फतवा नेपाळ राष्ट्र बँकेने काढला आहे. त्यासाठीची अधिसूचना त्यांनी काढली आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक भारतीय नोटांना नेपाळने प्रतिबंध घातला आहे. विशेष म्हणजे 5000 रुपयांपेक्षा या नोटा अधिक नको. म्हणजे नेपाळमध्ये जाताना तुम्हाला चिल्लरच घेऊन जावी लागणार आहे. ती पण 5000 रुपयांच्या आतमध्येच. 100 रुपये मूल्यांपेक्षा कमी असलेल्या भारतीय नोटाच तिथे वैध ठरविण्यात आल्या आहेत.
नेपाळ राष्ट्र बँकेने याविषयीची अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीयांना नेपाळमध्ये केवळ पाच हजार रुपयेच नेता येतील. याविषयीची माहिती सीमा शुल्क विभागाला देण्यात आली आहे. पण नेपाळी नागरिकांसाठी या नियमात सवलत देण्यात आली आहे. नेपाळी नागरिक भारतात 25 हजार रुपये रोख नेऊ शकतो. अत्यावश्यक सेवेसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे. तर चलन बदलासाठी ही मर्यादा 25 हजार रुपये करण्यात आली आहे.
कारण काय
असाच प्रश्न भारतीय आणि नेपाळी नागरिक केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बँकेला विचारत आहे. पण त्यांना अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. नेपाळच्या प्रमुखांनी आताच चीनचा दौरा केलेला आहे. चीनशी सलोख्याचे संबंध ठेवताना भारताविषयी नेपाळचे धोरण आकस बुद्धीचे असल्याचे समोर येत आहे.
काय होईल परिणाम
या धोरणामुळे भारत आणि नेपाळ सीमेवरील खुल्या बाजाराला, व्यापाराला आणि दोन्ही देशांच्या पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. धार्मिक पर्यटनही मोठ्या प्रमाणात होते, त्यावर पण परिणाम होऊ शकतो. याविषयी भारत सरकारने योग्य पावलं उचलण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.