कधी यशाच्या शिखरावर, मग कसे गुरफटले सुब्रत रॉय कायद्याच्या कचाट्यात
Subrata Roy | कधी देशातील सर्वात शक्तीशाली कुटुंबांपैकी एक असलेले सुब्रत रॉय यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. त्यांनी देशात मोठे साम्राज्य निर्माण केले. पण ते नंतर कायद्याच्या कचाट्यात अडकत गेले.
नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : सहारा परिवार, सहारा इंडियाचे सुप्रीमो सुब्रत रॉय यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकेकाळी देशातील सर्वात शक्तीशाली कुटुंबांपैकी ते एक होते. सहारा उद्योग रिअल इस्टेटपासून ते मीडियापर्यंत, हॉस्पिटॅलिटी, आर्थिक सेवा आणि विमान वाहतुकीपर्यंत पोहचला होता. या उद्योगाचा पसारा आणि विस्तार मोठा होता. सहारा ग्रुपकडे IPL टीम होती. पण एक चूक त्यांना महागात पडली आणि येथूनच नशीबाने त्यांची साथ सोडली. सुब्रत रॉय यांना 3 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. सेबीच्या कार्यालयात 127 ट्रक भरुन फाईल्स घेऊन ते पोहचले होते, त्यावेळी देशात चर्चा रंगली होती.
2010 पासूनचा घटनाक्रम
2010 मध्ये एका पत्राने सुब्रत रॉय यांच्या सहारातील सर्व कथित अनियमिततेची संपूर्ण काळी बाजू समोर आणली. 4 जानेवारी 2010 रोजी रोशन लाल नावाच्या एका व्यक्तीने नॅशनल हाऊसिंग बँकेला एक पत्र पाठवले. रोशन लाल इंदुरचे असून ते सीए होते. त्यांनी सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या बाँडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यात काही तरी घोळ सुरु असल्याचा दावा केला. सहारा ग्रुपने हे बाँड नियमा धाब्यावर बसून बाजारात आणल्याचा त्यात आरोप होता.
SEBI पर्यंत पोहचले प्रकरण
अर्थात एनएचबी-राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेकडे या आरोपांचा तपास करण्याचे अधिकार नव्हते. त्यांनी हे सर्व प्रकरण कॅपिटल मार्केट रेग्यलेटर सेबीकडे सोपवले. एका महिन्यात सेबीकडे पुन्हा याप्रकारची तक्रार आली. सेबीने 24 नोव्हेंबर 2010 रोजी सहारा ग्रुपला कोणत्याही प्रकारे सार्वजनिक निधी जमा करण्यास बंदी घालण्यात आली. सरतेशेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले. कोर्टाने सहारा ग्रुपला गुंतवणूकदारांचा पैसा 15 टक्के वार्षिक व्याजाने परत करण्याचा आदेश दिला. ही रक्कम 24,029 कोटी रुपये होती.
127 ट्रक फाईल घेऊन सेबीकडे
सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट 2012 मध्ये दोन्ही कंपन्यांना सेबीच्या मदतीने गुंतवणूकदारांचा पैसा तीन महिन्यात 15 टक्के वार्षिक व्याजाने परत करण्याचा निकाल दिला होता. सुब्रत रॉय 127 ट्रकमध्ये फाईल्स भरुन सेबीकडे बाजू मांडण्यासाठी पोहचले होते. पण त्यामध्ये गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती नव्हती. काही तपशील गहाळ होता. पुढे सहारा सेबीकडे तीन महिन्यात 15 टक्के व्याजदराने रक्कम जमा करण्यात अपयशी ठरले.
तीन वर्षे तुरुंगात
सहारा समुहातील कंपन्यांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. लाखो भारतीयांकडून निधी जमा करण्यात आला. त्यांना बँकिंग सुविधा मिळत नसल्याचे समोर आले. सहारा समूह गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्यात अपयशी ठरला. प्रकरणात रॉय यांना तीन वर्षांचा तुरुंगवास झाला. 6 मे 2017 रोजी आईच्या निधनामुळे ते पॅरोलवर बाहेर आले.