Gautam Adani : जेव्हा धीरूभाई अंबानी यांनी केली होती ब्लॅक कोब्रावर मात, अदानी आणि हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष झाला होता
हर्षद मेहता सारखी खेळी ब्लॅक कोब्राने धीरूभाई यांच्यासोबत खेळली होती. परंतू अंबानी डगमगले नाहीत. त्यांनी या लढाईत असा धोबीपछाड दिला की या कोब्राचे खोबरे खाण्याचे वांदे झाले होते.
मुंबई : अब्जाधीश अदानी यांच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याने सध्या सर्वांच्या नजरा शेअर बाजारातील अदानी समूहाच्या शेअर्सवर आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा ( Hindenburg Research ) अहवाल समोर आल्यानंतर अदानी ( Adani ) समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. हिंडेनबर्ग – अडानी प्रकरणाने अशा एका मोठ्या अब्जाधीशाने दिलेल्या लढ्याची आठवण होत आहे. हा लढा इतका मोठा होता की मुंबई शेअर बाजाराला तीन दिवस बंद ठेवावे लागले होते. काय घडले होते नेमके या लढाईत पाहूया..
ज्या प्रकारे अदानी एंटरप्राईझचा एफपीओ आल्यानंतर ओपन मार्केटमध्ये त्याचा एफपीओ प्राईस बॅंडच्या खाली गेला. तसाच प्रकाराचे वातावरण 31 वर्षांपूर्वी झाले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने अनेक आरोप करतानाच अब्जाधीश गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये त्यांनी शॉर्ट पोझिशन घेतली आहे. त्यांने अमेरिकेत ट्रेंड होणाऱ्या बॉण्ड्स आणि नॉन-इंडियन डेरिव्हेटिव्ह्जद्वारे ही शॉर्ट पोझीशन घेतली आहे. शॉर्ट सेलिंगच्या लढाईत तेव्हा दोन प्रमुख योद्धे होते, एक होते रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) आणि दुसरे होते, इंडीयन स्टॉक मार्केटचे कोब्रा !
धीरूभाई अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज 1977 मध्ये शेअरबाजारात लीस्ट झाली. वर्षभरातच दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला त्यांचा शेअर 50 रुपयांपर्यंत गेला. 1982 पर्यंत आरआयएलने 186 रुपयांची मजल गाठली होती, आरआयएलच्या RIL या झेपेवर ब्लॅक कोब्राचीही नजर होती. त्याचे नाव होते मनू माणेक त्याचा शेअर बाजारात प्रचंड दरारा होता. असे म्हटले जात होते की कोणताही शेअर किती चढवायचा आणि किती लोळवाचा ते त्याच्या हाताचा मळ होते.
बिग बूल पेक्षाही वेगळी कहानी
मनू माणेकच्या या इतिहासाची उजळणी या ताज्या वादामुळे घ्यायलाच हवी. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेली वेब सिरीज स्कॅम 1992 (Scam 1992) मध्ये हर्षद मेहता या बिग बूलची कहानी होती. हर्षद मेहताला घेरण्यासाठी मनू माणेक याने त्याच्या शेअरना शॉर्ट करने सुरू केले होते.
शॉर्ट सेलिंगने प्रॉफीट कमविणारे दलाल उधारीवर घेतलेले शेअर विकतात,जेव्हा हे मधले दलाल मार्केट प्राईजमध्ये हे शेअर विकण्यास सुरूवात करतात तेव्हा, शेअर शॉर्ट होऊन जातात. त्यांची अशा खेळीमागे शेअरचे भाव कोसळवण्याचा उद्देश असतो. त्यामुळे जेव्हा शेअरचे भाव कमी होताच त्यांची कमी भावात खरेदी करून सेटलमेंट केली जाते. मोठ्या प्रमाणावर केलेल्या शॉर्ट सेलींगने एवढा दबाव वाढतो की घाबरुन दुसरे गुंतवणूकदारही शेअर विकायला सुरूवात कतात. अशीच लढाई एकदा शेअर मार्केटमध्ये झाली होती. हॅमिश मॅकडॉनल्ड यांनी आपल्या ‘अंबानी एंड सन्स’ या पुस्तकात या लढाईचा लेखाजोखा मांडला आहे.
1980 आणि 1990 दशकात शेअर बाजारात मनू माणेक याची चांगलीच पकड होती. तेव्हा डेरीवेटीव्हचा जमाना नव्हता. त्यामुळे ओळखीच्या ब्रोकरकडून शेअर उधार घेऊन शॉर्ट सेलींगचा खेळ खेळला जात असतो. मनू या खेळाचा उस्ताद होता. आपल्या सारख्या लोकांना गोळा करीत त्याने स्वतचा दबावगट तयार केला होता. हर्षद मेहताच्या काळात मनू माणेक बरोबर राकेश झुनझुनवाला सारखे लोकही सामील होते.
हर्षद मेहता सारखी खेळी
हर्षद मेहता सारखी खेळी मनूने धीरूभाई यांच्यासोबत केली. 1982 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा राइट्स इश्यू आला. हा एक पार्शली कन्वर्टिबल डिबेंचर्स इश्यू होता. एक प्रकारे याद्वारे आरआयएल गुंतवणूकदारांकडून कर्ज उभारत होती. अंशतः कन्वर्टिबल डिबेंचर्सवर रिलायन्स कंपनी गुंतवणूकदारांना निश्चित व्याज देखील देत होती आणि या डिबेंचरचा काही हिस्सा एका विशिष्ट तारखेनंतर शेअर्समध्ये रूपांतरित करण्याची सोय देखील होती.
रिलायन्सचा इश्यू येताच शत्रू गट सक्रीय
ब्लॅक कोब्राने बाजारात नवीन असलेल्या धीरूभाईंना संपवण्यासाठी राइट्स इश्यू येताच रिलायन्सच्या शेअरची शॉर्ट सेलिंग सुरू केली, 18 मार्च रोजी शेअरची विक्री इतकी तीव्र होती की बाजार बंद होण्याच्या अर्धा तास आधी हडकंप माजला. मनू माणेकच्या गटाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे 3.5 लाख शेअर्स विकले.
RIL ची किंमत अचानक 131 रुपयांवरून 121 रुपयांपर्यंत खाली आली. शेअर बाजारातील सेटलमेंट दर दुसऱ्या शुक्रवारी व्हायचे. याचा अर्थ शॉर्टर्सने विकलेले शेअर 14 दिवसांनंतर त्यांच्या खरेदीदारांना मिळणार होते. मनू मानेक यांच्या गटाला कमी किमतीत शेअर्स खरेदी करून परत करण्याची संधी होती. त्याने विक्री वाढवली. हा धीरूभाईं अंबानी यांना मोठा धक्का होता.
अंबानी यांनी आपल्या लोकांना मोर्चा सांभाळायला सांगितले
अंबानी यांनी न डगमगता आनंद जैन यांच्यासारख्या जवळच्या लोकांना मोर्चा सांभाळायला सांगितले. त्यांनी कोणत्याही किंमतीत RIL चे शेअर्स विकू नका असे बजावले आणि कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास भाग पाडले. कोब्रा गटाने 11 लाख शेअर्सची विक्री केली. तर दुसरीकडे काही खास लोक मोठ्या प्रमाणावर त्यांची खरेदी करण्यासाठी तैनात केले होते. आखाती देशांतील अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांनी हे शेअर्स खरेदी केले. त्यांनी 8 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले. या गुंतवणूकदारांनी सुमारे 10 कोटी रुपयांचे RIL चे शेअर्स विकत घेतल्याचे म्हटले जाते.
ब्लॅक कोब्राचा डाव अंबानी यांनी उलटवला
त्यामुळे आरआयएलची RIL किंमत पुन्हा चढू लागली आणि ब्लॅक कोब्राचा डाव अंबानी यांनी त्याच्यावरच उलटवला. सेटलमेंटचा कालावधी जवळ आल्याने, खरेदीदारांना शेअर्स वितरीत करण्यासाठी मनू मानेक कॅम्पवर दबाव वाढला. बाजारातून शेअर्स खरेदी करणे हा आता फायदेशीर व्यवहार राहिला नाही, म्हणून त्याने रोलओव्हरचा मार्ग निवडला.
शॉर्ट सेलिंगच्या या खेळात तो अडकला
पण रोलओव्हर करण्यात अडचण होती. मनू मानेकच्या लोकांनी ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स विकले होते त्यांना जर त्याने रोलओव्हर करण्यास सांगितले असते. तर त्यांना प्रीमियम भरावा लागला असता. शॉर्ट सेलिंगच्या या खेळात मनू मानेकचा कॅम्प अडकला. शेअर्स खरेदी केलेल्या कथित NRI गुंतवणूकदारांनी 30 एप्रिल रोजी डीलीव्हरीची मागणी केली.
कोब्राची बत्ती झाली गुल
बहुतेक खरेदीदार धीरूभाईंचेच लोक असल्याचे मनु मानेकला कळल्यावर त्याची बत्तीच गुल झाली. शेवटी सेटलमेंटची वेळ आली. धीरूभाईंच्या कॅम्पने प्रति शेअर 25 रुपये प्रीमियमची मागणी केल्याचे सांगितले जाते. कोब्राची छावणी खचली. स्टॉक एक्स्चेंजमध्ये एवढा गोंधळ उडाला की तीन दिवस शेअर बाजार बंद ठेवावा लागला. माणेकला बाजारातून शेअर्स खरेदी करून सेटलमेंट करावी लागली. यामुळे आरआयएलच्या समभागाने 201 रुपयांचा पिक गाठला. एसके बरुआ आणि जेआर वर्मा यांनी त्यांच्या ‘द ग्रेट इंडियन स्कॅम’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘ते फसले होते. माणेक गटाला रिलायन्सचे शेअर्स चढ्या भावाने विकत घ्यावे लागले.