Paytm मध्ये मोठा बदल; तुम्हाला आला की नाही पॉपअप, UPI संबंधी करावे लागणार झटपट हे काम
Paytm UPI ID : पेटीएम युझर्सला लवकरच मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पेटीएमचे रिझर्व्ह बँकेने नाक दाबल्यापासून अनेक बदल सुरु आहेत. पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications ला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) याविषयीची परवानगी दिली आहे. जाणून घ्या सविस्तर...
भारतीय रिझर्व्ह बँकेने Paytm चे नाक दाबल्यानंतर अनेक बदल सुरु आहेत. व्यवहारातील अनियमिततेबाबत ही कारवाई करण्यात आलेली आहे. पेटीएम बँकेवर बंदी घातल्याने पेटीएमने युपीआय ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आणली आहे. बदलांच्या मालिकेत अजून एक कडी जोडल्या गेली आहे. आता युझर्सला लवकरच त्यांचा UPI ID बदलावा लागणार आहे. युपीआय आयडी बदलाचा पॉपअप लवकरच युझर्सला मिळणार आहे. त्यासाठी एकदा पेटीएम ॲप अपडेट करुन घ्या.
NPCI ने दिली मंजूरी
पेटीएम युझर्सचा सध्याचा UPI ID 98xxxxxxxx@Paytm असा आहे. लवकरच कंपनी युझर्सला नवीन UPI ID देणार आहे. युझर्स लवकरच हा नवीन युपीआय आयडी पुढील व्यवहारांसाठी बदलवू शकतील. पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications ला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) याविषयीची मंजूरी दिली आहे.
मनी लाँड्रिंगची शंका
पेटीएम बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लाँड्रिंगचा करण्यात आला आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात 1,000 हून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय आणि लेखापालांनी बँकेचा अनुपालन अहवाल तपासल्यावर त्यात अनेक कारनामे समोर आले. त्यात आरबीआयला मनी लाँड्रिंगची शंका कायम आहे.
या बँका धावल्या मदतीला
- NPCI ने 14 मार्च 2024 रोजी पेटीएमच्या मूळ कंपनीला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरच्या रुपाने काम करण्यास मंजूरी दिली होती. त्यानंतर पेटीएमने ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, यश बँक यांच्यासोबत भागीदारी केली. या बँका आता पेटीएम वापरकर्त्यांना युपीआय माध्यमातून व्यवहाराच्या सुविधा देतील.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएम युपीआय युझर्सला लवकरच पॉपअप पाठवणार आहे. या पॉपसाठी वापरकर्त्याची परवानगी मागितली जाणार आहे. त्यांना वर सांगितलेल्या चार बँकांपैकी एका बँकेच्या UPI Handle जसे @ptsbi, @pthdfc,@ptaxis आणि @ptyes पैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर युझर्स पेटीएमवर पूर्वीप्रमाणेच युपीआय सेवेचा वापर करु शकतील. यामध्ये वापरकर्त्यांन रक्कम प्राप्त करणे आणि ती हस्तांतरीत करणे ही सेवा मिळेल. आता QR Code संदर्भात बदल होणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.