Cognizant : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा विक्रम, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यापेक्षा चार पट पगार! कोण आहेत कॉग्निझंटचे नवीन सीईओ रवी कुमार
Cognizant : शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी रवी कुमार यांचा पगार ऐकून तुम्ही थक्क व्हाल
नवी दिल्ली : जगातील प्रमुख आयटी कंपनी कॉग्निझंटच्या (Cognizant) नवीन सीईओंचा पगार थक्क करणारा आहे. अब्जाधीश उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांचा पगार चार पट अधिक आहे. रवी कुमार यांची कॉग्निझंटच्या सीईओपदी नियुक्ती झाली. यापूर्वी ते इन्फोसिसचे (Infosys) पूर्व सीईओ होते. कंपनीने रवी कुमार यांना नवीन सीईओ आणि बोर्ड सदस्य म्हणून नियुक्त दिली. ते ब्रायन हम्फ्रीज यांची जागा घेतील. रवी कुमार 20 वर्षांपासून इन्फोसिसमध्ये होते. या नवीन वर्षात त्यांनी कॉग्निझंटच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली.
रवी कुमार यांचे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाशी घनिष्ठ नातं आहे. त्यांनी या विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. तर ओडिशातील झव्हेरिअर्समधून एमबीए केले आहे. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून ही काम केले आहे.
तर या नवीन पदाची जबाबदारी स्वीकारताना, त्यांच्या पगाराची चर्चा होत आहे. त्यांना कॉग्निझंटने जोरदार वेतन दिले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, रवी कुमार कॉग्निझंटमध्ये मोठ्या हुद्दासह मोठ्या पगारावर काम करतील.
रवी कुमार यांचे वेतन जवळपास 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 56,96,77,500 रुपये वार्षिक इतके आहे. तर बोनस रुपात त्यांना 7500,000 डॉलर मिळतील. कॉग्निझंट रवी कुमार यांना मूळ वेतन म्हणून 1 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 8,13,57,500 रुपये देणार आहे.
तर भत्ता आणि लाभ देयकांची ही सफर येथेच संपलेली नाही. कंपनीच्या वतीने त्यांना 2 दशलक्ष डॉलरपर्यंत कॅश इन्सेंटिव्ह देण्यात येईल. नोकरीत रुजू होण्यासाठी एकरक्कमी 5 दशलक्ष डॉलर देण्यात येतील. एका वर्षात ही रक्कम स्टॉक रिटर्न म्हणून देण्यात येईल.
वेतनाव्यतिरिक्त मिळणाऱ्या लाभांची जंत्री अजूनही थांबलेली नाही. त्यांना 3 दशलक्ष डॉलर पीएसयू रुपात अदा करण्यात येतील. तर 750000 डॉलर साइन इन बोनस रुपात मिळतील. याशिवाय कंपनीकडून देण्यात येणारे अनुषांगिक लाभही त्यांना मिळतील.
यापूर्वीचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांना कंपनीने 2020 मध्ये जवळपास 13.8 दशलक्ष डॉलरचे वेतन दिले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे वेतन 2019-20 मध्ये 15 कोटी रुपये होते. त्यांच्यापेक्षा रवी कुमार यांचे वेतन चार पट अधिक आहे. पण अंबानी यांनी गेल्या दोन वर्षांत वेतनासाठी एक रुपयाही घेतलेला नाही.
रवी कुमार यांना सीईओ असताना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कॉग्निझंटचे इन-डिमांड सोल्यूशन्स, मजबूत ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यावर त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. इन्फोसिसमध्ये ते यशस्वी ठरले होते. त्यांच्याकडून आता अधिक अपेक्षा आहे.