गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण ? हिंडेनबर्ग प्रकरणात राहुल गांधी यांचा सवाल, सुप्रीम कोर्ट स्वत: दखल घेणार का ?
गेल्यावर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदाणी समूहावर आरोप केले होते. त्यानंतर उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी या आरोपांचा गंभीर परिणाम अदानी ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला होता.

हिंडेनबर्गने सेबी अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला केला आहे. जर गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण ? असा सवाल विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी सेबीच्या अध्यक्षांवर केलेल्या आरोपांमुळे शेअर बाजार नियामक संस्थेच्या निष्पक्षपाती पणावर संशयाचे धुके जमले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय स्वत:पुन्हा दखल घेणार का ? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
सेबीने अदानी यांच्यावर कारवाई करण्यास हात आखडता घेण्यामागे सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती धवल यांची अदानी यांच्या विदेशी कंपन्यांतील भागीदारी असल्याचा आरोप अमेरिकन रिसर्च आणि गुंतवणूक फर्म हिंडेनबर्गने शनिवारी रात्री केला आहे. राहुल गांधी यांनी या संदर्भात एक्स खात्यावर एक पोस्ट केलेली आहे. त्यात म्हटले आहे की छोटे किरकोळ गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीची निष्पक्षता त्यांच्या अध्यक्षांवरच झालेल्या आरोपामुळे वादात सापडली आहे.
गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न : राहुल
राहुल गांधी यांनी म्हटले की देशभरातील ईमानदार गुंतवणूकदारांच्या मनात सरकारबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी आतापर्यंत राजीनामा कसा दिलेला नाही ? जर गुंतवणूकदारांची सर्व कमाई बुडली तर यासाठी जबाबदार असणार ? पंतप्रधान नरेन्द्र मोदी, सेबी अध्यक्ष वा गौतम अदानी ?
सेबीच्या अध्यक्षांनी आरोप फेटाळून लावले
हिंडेनबर्गच्या सनसनाटी आरोपांनंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रविवारी म्हटलेय की अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या विश्वसनियतेवर हल्ला करीत आहे. अध्यक्षांचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे. हिडेनबर्गने नवीन आरोपांना दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे. बाजार नियामक सेबीच्या अध्यक्ष तसेच त्यांच्या पती सोबत कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा खुलासाही अदानी ग्रुपने केला आहे.