Tina मुळे सराफा बाजारात खरेदीदारांची झुंबड; तिच्यामुळे सोने झाले महाग
Gold Price Today : सोन्याची चमक दिवसागणिक वाढत आहे. सोन्याच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य बेहाल आहे. पण या दरवाढीमागे Tina आहे, हे सांगितल्यावर तुम्ही म्हणाल कोण आहे ही टीना? तिच्यामुळे सोने इतके कसे महागले, तर चला जाणून घेऊयात..
12 एप्रिलपासून सोन्याने हनुमान उडी घेतली. अजून सोने काही 72,000 रुपयांच्या खाली उतरलेले नाही. 24 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक खिसा खाली करावा लागत आहे. 1 मार्च रोजीनंतर सोन्याच्यां किंमतीत मोठी उसळी आली. सोने अचानक सूसाट का धावत आहे, याची लोकांना काही कल्पना येईना. मध्य-पूर्वेतील देशांमध्ये सुरु असलेले युद्ध, अमेरिकन बँकेचे धोरण, रुपयाचे अवमूल्यन अशी काही कारणं पुढे येत होती. पण यापेक्षा ही एक जबरदस्त कारण पुढे आले आहे. सोन्यातील ही वाढ Tina मुळे आली आहे. तुम्ही म्हणाल दरवाढ वगैरे बाजूला ठेवा, ही टीना कोण ते अगोदर सांगा, तर चला जाणून घेऊयात ही टीना कोण आहे ते?
TINA मुळे सोन्याच्या खरेदीसाठी एकच झुंबड
टीनामुळे सराफा बाजारात ग्राहकांनी एकच झुंबड उडाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतीयांवर टीनाची कोणती ही मोहिनी नाही. तर भारताचा शेजारी चीनच्या लोकांना मात्र या टीनाने भुरळ घातली आहे. एका अहवालानुसार, गेल्यावर्षी 2023 चीनमधील लोकांनी सर्वाधिक सोने खरेदी केली. चीनच्या नागरिकांनी गेल्या वर्षी एकूण 630 टन सोने खरेदी केले. तर भारतीयांनी याच कालावधीत 562.3 टन सोने खरेदी केली.
काय आहे टीना फॅक्टर
टीना (TINA) चा अर्थ आहे – There is no alternative, दुसरा कोणताच पर्याय नाही. भविष्यातील अनिश्चिततेमुळे चीनमधील नागरीक भयभीत झाले आहेत. चीनमधील नागरीक पण भारतीय नागरिकांसारखे सुवर्णप्रेमी आहेत. सोन्याशिवाय दुसरा कोणताच गुंतवणुकीचा चांगला पर्याय नसल्याचे त्यांचे मत झाले आहेत. चीनमध्ये केवळ जनताच नाही तर, व्यापारी, दुकानदार, गुंतवणूकदार, इतकेच काय तिथल्या केंद्रीय बँकेला सुद्धा सोन्यात गुंतवणुकीसाठी बाध्य केले आहे. त्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या. त्याचे चटके भारतीय ग्राहकांना सहन करावे लागत आहे.
सोन्याचा तुकडा, नाण्याची वाढती मागणी
- चीनमध्ये सोन्याचे दागिने, तुकडे आणि नाणी यांच्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. बीजिंगमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 10 टक्के वाढ झाली आहे. तर भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 6 टक्के वाढ झाली आहे. चीनमध्ये सोन्याचा तुकडा आण नाण्यात गुंतवणुकीचे प्रमाण 28 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
- काँन्ग प्रीशिअर मेटल्स इनसाईट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप लॅपविज यांनी (Philip Klapwijk) एक अंदाज वर्तवला आहे. ब्लूमबर्गने तो त्यांच्या वृत्तात छापला आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव पुन्हा वधारण्याची दाट शक्यता आहे.
- चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट, प्रॉपर्टी क्षेत्रात मंदीचे वारे आहे. शेअर बाजारात सर्वदूर चढउताराचे सक्ष सुरु आहे. रुपयाप्रमाणेच चीनचे चलनाने सुद्धा डॉलरपुढे गुडघे टेकवले आहेत. त्यामुळे दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे नमूद करत चीनी नागरिक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.