एप्रिल महिन्यात घाऊक महागाई गेल्या 9 वर्षांतील सर्वोच्च स्थरावर; मार्चच्या तुलनेत मोठी वाढ
एप्रिल महिन्यात ठोक महागाई किती टक्के वाढली याबाबतचा डेटा समोर आला असून, एप्रिल महिन्यात ठोक महागाई वाढून तब्बल 15.08 टक्क्यांवर पोहोचली आहे. ही गेल्या 9 वर्षांमधील सर्वात मोठी वाढ आहे.
एप्रिल (April) महिन्यात घाऊक महागाई (WPI for April) किती टक्के वाढली याबाबतचा डेटा समोर आला असून, एप्रिल महिन्यात घाऊक महागाई वाढून तब्बल 15.08 टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईने (inflation) गेल्या 9 वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मार्चमध्ये ठोक महागाईचा दर 14.55 टक्के एवढा होता. गेल्या महिन्यात बाजाराच्या तुलनेत महागाईचा दर हा खूप जास्त राहिला. मात्र दुसरीकडे गेल्या मार्च महिन्यात भाज्यांच्या घाऊक दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मार्च महिन्यात भाज्याचा घाऊक दर 23.24 टक्क्यांवरून 19.88 टक्क्यांपर्यंत खाली आला. मासिक आधारावर त्यामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. बटाच्या घाऊक दरात 4.02 तर कांद्याच्या दरात 9.33 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. एकीकडे कंपन्यांकडून बाजारात दाखल होणाऱ्या वस्तू महाग झाल्या, मात्र दुसरीकडे शेतीतून बाजारात दाखल होणाऱ्या मालाच्या दरात घसरण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला.
अन्न महागाईत वाढ
दरम्यान दुसरीकडे जेवणाची किंमत देखील दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. एप्रिल महिन्यात अन्न-धान्याच्या ठोक महागाईत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. एप्रिल महिन्यात अन्न महागाई 8.88 टक्क्यांवर पोहोचली. मार्च महिन्यात अन्नधान्य महागाईचा दर हा 8.71 टक्के एवढा होता. एप्रिल महिन्यात इंधनाचे ठोक दर देखील वाढले असून, ते 38.66 टक्क्यांवर पोहोचले आहेत. मार्च महिन्यात ते 34.52 टक्के इतके होते.
The annual rate of inflation was 15.08% (Provisional) for the month of April 2022 (Y-o-Y) as compared to 10.74% in April 2021: Govt of India
— ANI (@ANI) May 17, 2022
किरकोळ माहागाईत मोठी वाढ
ठोक महागाई तर वाढलीच आहे. मात्र दुसरीकडे एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईत देखील मोठी वाढ दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई ही गेल्या आठ वर्षातील सर्वोच्च स्थानावर पोहोचली आहे. महागाईबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई 7.79 टक्क्यांवर पोहोचली आहे. प्रामुख्याने खाद्य पदार्थ आणि खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने किरकोळ महागाईत भर पडली आहे. कीरकोळ महागाईच्या पाठीमागे भडकलेल्या खाद्य पादार्थ्यांच्या किमती हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. किरकोळ महागाईने मे 2014 चा स्थर गाठला आहे. हा सलग चौथा महिना आहे. ज्या महिन्यात किरकोळ महागाई ही सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे.