मुंबई : अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती (Adani Group property) बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 32.4 अब्ज डॉलर म्हणजेच 2.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पण अदानी ग्रुपवर 17 अब्ज डॉलर इतकं कर्ज आहे. तरीही गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये चांगला विकास होत आहे. त्यांना या कंपन्यांमधून चांगला नफा मिळत आहे. याशिवाय त्यांच्या शेअरचे भाव तेजीत वाढत चालले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या कंपनीचे शेअर सोडण्यास इच्छुक नाहीत, असं तज्ज्ञ लोकं सांगतात.
अदानी ग्रुपच्या ‘या’ कंपन्यांची यशस्वी घोडदौड
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचं (Adani Group property) कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या मायनिंग, गॅस आणि पोर्ट्स यांसह अनेक कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी (14 डिसेंबर) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अदानी एंटरप्रायजच्या शेअरमध्ये 5.60 टक्क्यांनी तेजी आली. अदानी ग्रुपच्या सोलार क्षेत्रात 6 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारानंतर त्यांच्या ग्रीन एनर्जी शेअरची किंमत 6 पटीने वाढली आहे.
कर्जबाजारी असूनही त्यांचा कारभार जोमात सुरु
अदानी ग्रुपने जगभरातील अनेक कंपन्यांसोबत करार केले आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली पाळमुळं घट्ट करु पाहत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढत चालला आहे. गुंतवणूकदार कंपनीचे शेअर करण्यास इच्छुक नाहीत. कंपनीवर कर्ज असलं तरी पुढचे पाच ते सहा वर्ष कंपनीचा कारभार अतिशय उत्तमपणे चालेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्तींनी वर्तवला आहे.
ब्लूमबर्गच्या बिलियनेयर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी 21.2 अब्ज डॉलर म्हणजेच 1.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सलादेखील चांगली किंमत मिळाली आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली. मात्र, अदानी ग्रुपचा व्यवसाय कोरोना काळातही तेजीत होता.
हेही वाचा : बर्गर किंगचे शेअर वाढले, 10 दिवसांत दाम दुप्पट !