Muhurat Trading : दिवाळी 31 ऑक्टोबरला मग मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबरला का? काय आहे यामागील कारण
Muhurat Trading Diwali 2024 : दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार एक दिवसासाठी उघडतो. या एक तासाच्या व्यापाराला मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात. NSE आणि BSE ने मुहूर्त ट्रेडिंगसंदर्भात एक सूचना दिली आहे. त्यानुसार यावेळी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होईल. तर दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी असेल.
दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणतात. जर तुम्ही शेअर बाजारातून कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरू शकते. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. यावेळी दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी साजरी होईल. पण मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. NSE आणि BSE ने मुहूर्त ट्रेडिंगसंदर्भात एक सूचना दिली आहे. त्यात हा खुलासा केला आहे.
मुहूर्त ट्रेडिंग आहे तरी काय?
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगचा खास मुहूर्त साधल्या जातो. या दिवशी बाजारात केलेली गुंतवणूक शुभ मानण्यात येते. दिवाळीचा काळ कोणतेही नवीन काम करण्यासाठी शुभ मानण्यात येतो. या दिवशी एक तासासाठी बाजारात व्यापार करता येतो. मुहूर्त ट्रेडिंगला केलेला व्यापार वर्षभरासाठी शुभ मानण्यात येतो. त्यामुळे एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग वर्षभराच्या समृद्धीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानल्या जातो.
1 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NSE ने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सेशन 1 नोव्हेंबर 2024 रोजी, शुक्रवारी होईल. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6 ते 7 या वाजेदरम्यान असेल. या दरम्यान गुंतवणूकदार स्टॉक खरेदी-विक्री करू शकतील. नोव्हेंबर रोजी प्री-ओपनिंग सेशनची वेळ संध्याकाळी 5:45 ते 6:00 या दरम्यान असेल.
कारण तरी काय?
यावेळी दिवाळीविषयी थोडा संभ्रम आहे. देशात दिवाळी सण यावेळी 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येईल. शेअर बाजारात दिवाळीची सुट्टी यंदा 1 नोव्हेंबर रोजी असेल. यादिवशी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंग असेल. NSE नुसार, सण आणि इतर कारणांमुळे सुट्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. बीएसईने त्यांच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. त्यानुसार, 1 नोव्हेंबर रोजी खास मुहूर्त ट्रेडिंग होईल. अजून वेळेविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचा फायदा झाल्याचे दिसून येते. त्यांना पॉझिटिव्ह रिटर्न मिळाल्याचे समोर आले आहे. गेल्या 17 मुहूर्त ट्रेडिंग सेशनमधील 13 सेशनमध्ये गुंतवणूकदारांचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 2008 मध्ये जागतिक मंदी असताना सुद्धा शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी 5.86 टक्के चढला.