Gold Expensive : सोने का असते इतके खास, का बरं असते इतके महाग!
Gold Expensive : सोन्याशिवाय जगाचे पान का बरं हालत नाही. असं काय खास आहे या सोन्यात...
नवी दिल्ली : भारतीयांचं सुवर्ण प्रेम जगजाहीर आहे. चीनमध्ये पण सोन्याचं वेडं आहे. भारतीय विवाह सोहळ्यात अनेक स्त्रीयाच नाही तर पुरुषही सोने (Gold) घालून मिरवतात. सोने हा केवळ श्रीमंतीचा दागिना आहे असं नाही. गुंतवणुकीसाठी (Investment) पण सोन्याला सर्वाधिक पसंती देण्यात येते. गेल्या 10-15 वर्षांत सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. सोन्याचे भाव इतके का वाढले, त्यामागची कारणं काय आहेत, याच्या खोलात कोणीच जात नाही. सोन्याचा भाव दुप्पटीहून वाढला असला तरी लोकांची कोणतीच खंत नाही. आर्थिक संकटात आजही सोनेच उपयोगी पडते ही दृढभावना यापाठीमागे आहे. सोन्याशिवाय पान का बरं हालत नसेल…
सोन्याची मोहिनी कायम सोने महागण्यामागे अनेक भावनांची सरमिसळ आहे. शक्ती, राजेशाही आणि संपत्तीचे प्रतिक सोने आहे. कित्येक हजार वर्षांपासून सोन्याचा वापर सुरु आहे. भारतात तर सोन्याच्या दागिन्यांचा मोह आणि सोन्याचे गारुड आजही कायम आहे. पूर्वी व्यापार, अंतर्गत व्यवहार यासाठी पण सोन्याचा वापर होत होता. सोन्याची मोहिनी कायम आहे. पूर्वीच्या राजवटीत काही राजांनी सोन्याचा चलन म्हणून पण वापर केला आहे.
यामुळे महाग आहे सोने एखाद्या देशाचे चलन बंद झाल्यास, सोने चलन म्हणून वापरता येते. त्यामुळे अनेक देशाच्या केंद्रीय बँका नेहमी त्यांच्याकडे सोन्याचा साठा करुन ठेवतात. सोने तारण ठेऊन अनेक देश कर्ज घेतात. ही प्रथा आजही कायम आहे. भारताला पण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्यापूर्वी किती तरी टन सोने गहाण टाकावे लागले होते. सोन्याचे स्वतःचेच एक मोठे मूल्य आहे. हा मौल्यवान धातू आहे आणि त्याला जागतिक मान्यता आहे. हा धातू सहजासहजी उपलब्ध होत नाही. तो खाणीत काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच त्याचे मूल्य सर्वाधिक आहे.
ही पण आहेत वैशिष्ट्ये सोने वितळवून तुम्ही त्याला कोणतेही रुप देऊ शकता. हे हाय ग्रेड इलेक्ट्रॉनिक्स, डेन्टिस्ट्री, मेडिकल, डिफेन्स आणि एयरोस्पेस उपकरण तयार करण्यासाठी उपयोगात येते. या सोन्याचा वापर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये करण्यात येतो. सोन्याची चमक डोळ्यांना आणि मनाला भूरळ घालते. या मौल्यवान धातूचे रुप अनेकांना मोहून टाकते. या धातूला कधी गंज लागत नाही. सोने अनेक वर्षे चालत राहते. अनेक मिठाई आणि औषधांमध्ये सोन्याचा वर्ख लावलेला असतो.
नोट छापताना होतो उपयोग आता तुम्ही म्हणाल, नोट छापण्यासाठी सोन्याचा काय उपयोग होत असेल? तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 200 कोटींची ठेव असेल तर ही बँक नोट छापू शकते. पण हे 200 कोटी रुपये केवळ रोख रक्कम नसते. तर याचा मोठा हिस्सा हा सोन्याचा असतो. 200 कोटींच्या या ठेवीत 115 कोटी रुपयांचे सोने असते. तर उर्वरीत इतर देशांचे चलन असते. परकीय गंगाजळीचा समावेश असतो. त्याआधारेच भारतीय गव्हर्नर आपल्याला चलनाचे मूल्य अदा करण्याचे अभिवचन देतो, भावा.